अमेरिकन डॉलर वधारत असला तरी सोन्यात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:05 PM2018-08-18T12:05:24+5:302018-08-18T12:06:21+5:30
सुवर्णनगरीत सोने ३० हजाराच्या खाली
विजयकुमार सैतवाल
जळगाव : अमेरिकन डॉलर वधारून भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण होत असली तरी या वेळी सोन्याचेही भाव कमी-कमी होत असल्याचे उलट चित्र विदेशासह भारतातही दिसून येत आहे. यामुळे सराफ बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारी तर सुवर्णनगरी जळगावात सोन्याचे भाव ३० हजाराच्या खाली येऊन २९ हजार ९०० रुपयांवर आले आहे. गेल्या आठ महिन्यातील निच्चांकी पातळी सोन्याने गाठली आहे.
अमेरिका, युरोपियन देशांच्या सराफ बाजारावर भारतीय बाजारातील सोन्याचे भाव अवलंबून असतात. त्यामुळे एरव्ही अमेरिकन डॉलर वधारल्यास भारतीय रुपयात घसरण होऊन भारतात सोन्याचे भाव वाढतात. मात्र सध्या या उलट चित्र आहे.
३० हजाराच्या खाली आले सोने
रुपयाची घसरण सुरूच असून अमेरिकन डॉलर सध्या उच्चांकीवर पोहचला आहे. शुक्रवारी एका डॉलरचे मूल्य ७० रुपयांवर पोहचले. रुपयातील या घसरणीमुळे सोन्याचे दर वाढणार अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र गेल्या आठवड्यापासून सोन्यात घसरण होताना दिसत आहे. ८ आॅगस्ट रोजी ३० हजार १०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ९ आॅगस्ट रोजी १०० रुपयांनी घसरण होऊन ते ३० हजारावर आले. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजीदेखील सोने ३० हजारावर होते. मात्र १७ रोजी सोन्याचे भाव २९ हजार ९०० रुपयांवर येऊन सोने ३० हजाराच्या खाली आले. महिनाभरात ११ रुपयांनी भाव कमी झाले आहे.
आठ महिन्यातील निच्चांकी
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच १ जानेवारी २०१८ रोजी सोन्याच्या २९ हजार ९०० रुपयांच्या भावासह सराफ बाजारातील व्यवहारास सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र सोन्याच्या भाववाढीस सुरुवात होऊन सोन्याने ३० हजाराचा पल्ला गाठला. त्यानंतर ही वाढ कायम राहत लग्नसराईमध्ये सोने ३१ हजाराच्या पुढे गेले. मात्र जुलै महिन्यापासून यात घसरण होत जाऊन १७ आॅगस्ट रोजी ते ३० हजाराच्या खाली आले.
का होतेय सोन्यात घसरण?
डॉलरचे मूल्य वाढत असल्याने सोन्याचेही भाव वाढणे अपेक्षित होते. मात्र अमेरिकन सुवर्ण बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याचे भाव ४५ प्रति डॉलरने कमी झाले आहे. गेल्या आठवड्यात १२२० डॉलर (भारतीय मूल्य ८६ हजार ९४० रुपये) प्रति अंस असलेले सोने या आठवड्यात ११७५ डॉलरवर आले आहे. त्यामुळे भारतातही सोन्याच्या भावात घसरण होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. (अमेरिकेत प्रती तोळ््या ऐवजी प्रती अंस सोने मोजले जाते. एक अंस म्हणजे २८.३४ ग्रॅम सोने)
या सोबतच सध्या सोने-चांदीला मागणी कमी असल्याने सोन्याचे भाव कमी होण्यास मदत मिळत आहे.
अमेरिकन डॉलरचे मूल्य वधारत असले तरी विदेशात सोन्याच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळे भारतातही सोन्याचे भाव कमी होत आहे. त्यात सध्या मागणी कमी आहे, त्याचाही परिणाम जाणवत आहे.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन