‘कोरोना’च्या सावटातही अक्षय तृतीयेमुळे घरोघरी उभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 04:13 PM2020-04-25T16:13:46+5:302020-04-25T16:16:21+5:30
खान्देशाच्या कृषी संस्कृतीशी नाळ जोडलेला लोकोत्सव म्हणून अक्षय तृतीयेला (आखाजीला) 'अक्षय' मानाचे पान आहे. यंदा मात्र कोरोनासोबत आलेल्या टाळेबंदीने या आनंदाची परीक्षा घ्यायचे ठरविलेले दिसते.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : खान्देशाच्या कृषी संस्कृतीशी नाळ जोडलेला लोकोत्सव म्हणून अक्षय तृतीयेला (आखाजीला) 'अक्षय' मानाचे पान आहे. यंदा मात्र कोरोनासोबत आलेल्या टाळेबंदीने या आनंदाची परीक्षा घ्यायचे ठरविलेले दिसते. टाळेबंदीची मासिकपूर्ती अनुभवणा-या घरांमध्ये अक्षयतृतीयेमुळे चांगलीच उभारी आल्याचे चित्र दिसून आले. बाजारात मात्र 'निगेटिव्ह' वातावरण होते. तयार पुरणपोळी घेण्याकडे गृहिणींचा कल असून सोने खरेदीसाठी दुकाने बंद असली तरी 'आॅनलाईन खरेदी'चे दालन मात्र उघडे झाले आहे.
वैशाख शुद्ध तृतीयेलाच 'अक्षय तृतीया' म्हणतात. साडेतीनपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणूनही आखाजीचे विशेष महत्व आहे. शेतकरी याच दिवशी नविन वर्षाची सुरुवात करतात. शेती हंगामाच्या नियोजनाचा मुहूर्तही अक्षय तृतीयेलाच असतो. बाजारालादेखील आखाजीमुळे तेजीची झळाळी येते. यंदा मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. बाजार 'कुलूपबंद' असून आर्थिक चक्र उसवल्याने शेतकरीही अडचणीत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट गडद झाले आहे. पूर्वसंध्येला शनिवारी 'मातीच्या' घागरी घेण्यासाठी तुरळक प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले.
गेल्या अनेक वर्षात नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने पांगलेली कुटुंंबे एकत्र आली असून घरे मौजमस्तीने खुलून गेली आहेत. अक्षय तृतीयेमुळे घरोघरी काहीअंशी आनंदाची उभारी आली आहे. मात्र प्रत्येकाच्या मनात कोरोनाच्या भीतीचा 'सल' कायम आहे. कोणताही सण मात्र जगण्याचा आणि लढण्याचा मंत्र रुजवून जात असतो.
'सण आखाजी मोलाचा
सणांमध्ये जो तोलाचा
दुर्दम्य आशावाद देतो
लढण्याचा - जगण्याचा'
यावर्षी अक्षय तृतीया हाच संदेश घेऊन आली आहे.
वाहनांच्या खरेदीला ब्रेक, सोने खरेदी 'आॅनलाईनने'
आखाजीला खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात. दिलेले दान, केलेले धार्मिक विधी यांचा क्षय होत नसल्याची परंपरा आहे. यामुळेच नवीन वास्तू प्रवेश असो की उद्घाटने, वाहन खरेदी अक्षय तृतीयेच्या मृहूर्तावरही मोठ्या प्रमाणात होते. सोने खरेदी केली जाते. टाळेबंदी असल्याने दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीचे बेत अनेकांनी पुढे ढकले आहे. नवीन वास्तू प्रवेशही लांबले आहेत. सोने खरेदीसाठी मात्र काहींनी आॅनलाईन पर्याय वापरल्याचे सराफ व्यापा-यांनी सांगितले. टाळेबंदी नंतरही लगेच सोने खरेदी होणार नाही. त्यासाठी दिवाळीपर्यत वाट पाहवी लागेल, असे सुवर्ण व्यापा-यांचे म्हणणे आहे.
मातीच्या घागरीचे दरही वधारले
खान्देशात पित्तरांचे स्मरण म्हणून घागर भरतात. पुरणपोळी व आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवला जातो. यावर्षी टाळेबंदीमुळे घागर तयार करणारे कुंभारवाडे शांत होते. थेट मध्यप्रदेशातून तयार घागरी विक्रीसाठी आल्या. वाहतुकीचा खर्च वाढल्याने ८० रुपये नग असे घागरीचे दर उसळी घेऊन होते. गेल्या वर्षी घागर ६० रुपयांना विकली गेली.
टाळेबंदीमुळे कोकणचा राजा 'हापूस' विक्रीसाठी दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे हापूस खरेदीची लयलूट सुरू आहे.
आंब्याचा रस आणि खापरावरची साजूक तूप टाकलेली खमंग पुरणपोळी हा अक्षय तृतीयेचा खास नैवेद्य. गेल्या काही वर्षात घरगुती आणि बचत गटांमार्फतही तयार पुरपोळी मिळू लागली आहे. ६० रुपये प्रति नगाप्रमाणे आॅर्डरप्रमाणे पुरणपोळ्या बनवून मिळतात. शनिवारी दिवसभर घरगुती पुरणपोळी तयार करुन विक्री करणा-या महिलांची लगबग सुरू होती.
'जग रहाटी चालीन
सण येतीन - जातीनं
नात नव जुन व्हईन
अंकुर जगाना फुटीनं'
अशी सकारात्मक यावर्षी आखाजीने जागवली आहे. कोरोनाने भयग्रस्त असणा-या वातावरणात हे मोलाचे ठरते.
लेकीबाळी अडकल्या 'टाळेबंदीत'
आखाजी व दिवाळी म्हणजे सासुरवाशिणींच्या मैत्रिणीचं. आखाजीचा सण जवळ येऊ लागला की सासरी गेलेल्या लेकीबाळींना माहेराची ओढ लागते. यावर्षी टाळेबंदीमुळे गावोगावच्या सीमा बंद केल्याने सासुरवाशिणी सासरीच अडकल्या आहेत. ग्रामीण भागात आखाजीच्या काही दिवस अगोदरच मुली व महिला झोके बांधून अहिराणी गाणी म्हणतात.
त्यात भाऊराया घेण्यास येणार असल्याचे कौतुक असते.
'भाऊ मना टांगाज टांगाज जपूस रे बा...
बहीण मनी गय्यर गय्यर रडस रे बा...'
वृक्षांची डेरेदार सावली आणि झोक्यांची उंच झेप घेत म्हटलेल्या गाण्यांचे स्वर यंदा कानी पडत असले तरी त्यांचा आवाज कमी झाल्याचे जाणवले.
'अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खायव
कैरी फुटनी खडक फुटना, झुय झुय पानी व्हायवं
झुय झुय पानी व्हाय तठे कस्साना बाजार वं
माय माले टिपऱ्या ली ठेवजो बंधूना हाते दी धाडजो...' अशा अहिराणी गीतांचा साखर गोडवा यामध्ये आहे. संकट कोणतही असो परंपरा आणि लोकोत्सव टिकून राहतात ते त्यांच्या काळसापेक्षतेमुळे. कोरोनाकळा असलेली यंदाची आखाजीदेखील याला अपवाद ठरू शकत नाही.