वडिलांचा मृत्यू समोर दिसत असतानाही ‘त्याने’ लिहिला पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 02:52 PM2019-03-05T14:52:39+5:302019-03-05T14:55:00+5:30
तो पेपरला द्यायला निघाला, तेव्हा त्याच्या डोळ्यात वडिलांच्या आजवरपणाचे अश्रू एकवटले होते. हुंदकाही दाटून येत होता. पेपरहून परतल्यानंतर त्याच्या वडिलांची प्राणज्योत विझली होती. पार्थिवाला खांदा देतानाच पुढचे सर्व पेपर द्यायचे आणि वडिलांना श्रद्धांजली अर्पण करायची. जयेश जिजाबराव बोरसे याच्या धिरोदत्त संकल्पाने अनेकांना आपला हुंदाका आवरता आला नाही. जयेश आ.बं.विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा देत आहे. मराठीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी त्याचे वडील प्रा.जिजाबराव बोरसे यांचा मृत्यू झाला.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव, जि.जळगाव : तो पेपरला द्यायला निघाला, तेव्हा त्याच्या डोळ्यात वडिलांच्या आजवरपणाचे अश्रू एकवटले होते. हुंदकाही दाटून येत होता. पेपरहून परतल्यानंतर त्याच्या वडिलांची प्राणज्योत विझली होती. पार्थिवाला खांदा देतानाच पुढचे सर्व पेपर द्यायचे आणि वडिलांना श्रद्धांजली अर्पण करायची. जयेश जिजाबराव बोरसे याच्या धिरोदत्त संकल्पाने अनेकांना आपला हुंदाका आवरता आला नाही. जयेश आ.बं.विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा देत आहे. मराठीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी त्याचे वडील प्रा.जिजाबराव बोरसे यांचा मृत्यू झाला.
के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रा.जिजाबराव बोरसे हे मूळचे चिंचखेडे येथील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. २७ फेब्रुवारीनंतर त्यांचा आजार बळावल्याने दहावीचा अभ्यास करणाऱ्या जयेशचे मन कासाविस व्हायचे. काळजावर दगड ठेवून तो मन अभ्यासात गुंतवायचा.
१ रोजी वडिलांची खालावलेली प्रकृती पाहून त्याला कोलमडून पडायला झाले. मात्र स्वत:ला सावरत आणि जणू वडिलांकडे अखेरचा कटाक्ष टाकीत तो मराठीच्या पेपरला गेला. डोळ्यासमोर वडिलांचे मृत्यूशय्येवरील कलेवर असतानाही जयेशने पेपर पूर्ण सोडवला. इकडे घरी मात्र त्याच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला होता. नातेवाईकांनी संयम बाळगून त्याला वडिलांची दु:खद वार्ता कळवली नाही. घरी परल्यानंतर जयेशवर वडिलांच्या पार्थिवालाच खांदा देण्याचे डोंगराएवढे दु:ख कोसळले.
उत्तरकार्य आणि इंग्रजीचा पेपर
मुलावर आणखी आघात नको म्हणून स्व.जिजाबराव बोरसे यांचे उत्तरकार्य पाचव्या दिवशी उरकण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मंगळवारी सकाळी जयेशने सर्व विधी पार पाडले. यानंतर तो इंग्रजी विषयाच्या पेपरला सामोरे गेला.
आईची किडनी अन् मृत्यूचा पाठलाग
स्व.जिजाबराव बोरसे यांचे चौकोनी कुटुंब. अगदी हम दो, हमारे दो... असे. चार वर्षांपूर्वी ते आजारी पडले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या जिजाबराव यांना त्यांची आई लीलाबाई यांनी पुन्हा एकदा जीवदान दिले. आपली किडनी त्यांनी मुलासाठी दिली. गेली चार वर्षे त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र चार वर्षांनंंतर पुन्हा मृत्यूने त्यांचा सुरू केलेला पाठलाग १ मार्च रोजी पूर्ण केला. त्यांची मोठी मुलगी तेजल चाळीसगाव महाविद्यालयात शेवटच्या वर्षात असून जयेश यंदा दहावीची परीक्षा देत आहे.
जड अंत:करणाने पहिला पेपर लिहिला. घरी आल्यावर वडिलांचा मृतदेह पाहून उन्मळून पडलो. मंगळवारी उत्तरकार्याचे सर्व विधी उरकले. दहावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
- जयेश बोरसे
इयत्ता दहावी, आ.बं.विद्यालय, चाळीसगाव, जि.जळगाव