अखेर रेल्वे प्रशासनाने मातीचा भराव काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:28+5:302021-06-09T04:19:28+5:30
जळगाव : तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करतांना, पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे गटार किंवा बोगदा न उभारण्यात आल्यामुळे, दापोरा ...
जळगाव : तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करतांना, पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे गटार किंवा बोगदा न उभारण्यात आल्यामुळे, दापोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. या बाबत `लोकमत`ने वृत्त प्रकाशित करताच, रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन, पाण्याचा निचरा होण्यासाठी सोमवारी तिसऱ्या रेल्वे मार्गावरील मातीचा भराव काढला आहे. यामुळे शेतातील पाण्याचा काही वेळातच निचरा होणार असून, यामुळे शेतकऱ्यांचे पीक हानीचे नुकसान टळले आहे.
रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षापासून तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. शिरसोली रेल्वे स्टेशनच्या पुढे दापोरा शिवारात तिसऱ्या मार्गासाठी मातीचा भराव टाकल्यानंतर रेल्वे प्रशासनाने, मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था केली नाही. तिसऱ्या मार्गासाठी मातीचा भराव टाकल्यामुळे, जुना बोगदा बुजविण्यात आला होता. मात्र, शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी पुन्हा गटार किंवा बोगदा तयार न करण्यात आल्यामुळे, हे पाणी परिसरातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतात तुंबले होते. यामुळे यंदाचा हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त करीत, शेतकरी बांधवांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर `लोकमत`ने शेतकऱ्यांची समस्या मांडल्यानंतर, रेल्वे लागलीच या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी तिसऱ्या रेल्वे मार्गाचा भराव काढुन, जुना बोगदा पुन्हा मोकळा केला आहे.
ईन्फो :
अन् शेतकरी बांधवांनी मानले `लोकमत`चे आभार
लोकमतच्या वृत्ता नंतर रेल्वेचे उपमुख्य अभियंता पकंज डावरे यांनी तात्काळ संबंधित मक्तेदाराला पाण्याचा निचरा होण्यासाठी मातीचा भराव काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर मक्तेदाराने तात्काळ हा भराव बाजूला करून, पाण्याला वाट करून दिली आहे. याबाबत येथील शेतकरी बांधव पुंडलिक सुरवाडे, नाना गवंदे, बापू गवंदे, बापू मराठे, माणिक गवंदे या शेतकऱ्यांनी `लोकमत`च्या पाठपुराव्या मुळेच रेल्वे प्रशासनाने तातडीने मातीचा भराव काढला. त्यामुळे `लोकमत`चे आपण मानत असल्याचे या शेतकरी बांधवांनी सांगितले.