रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:00+5:302020-12-12T04:33:00+5:30
अगदी सुरुवातीच्या काळात डॉक्टरांच्या ड्यूटीचा विषय होता. त्यासाठी एक समिती स्थापन केली. प्रत्येकाकडे विविध जबाबदाऱ्या सोपविल्या. कामात सुटसुटीतपणा आणण्याचा ...
अगदी सुरुवातीच्या काळात डॉक्टरांच्या ड्यूटीचा विषय होता. त्यासाठी एक समिती स्थापन केली. प्रत्येकाकडे विविध जबाबदाऱ्या सोपविल्या. कामात सुटसुटीतपणा आणण्याचा नेहमी प्रयत्न राहिला. सुरक्षा आणि स्वच्छता या कुठल्याही यंत्रणेतील दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. आम्ही त्याच्यावर अधिक भर दिला. स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही कसलाच निष्काळजीपणा केला नाही आणि कक्षच नव्हे तर पूर्ण परिसर आम्ही पिंजून काढून स्वच्छ केला. सुरक्षेच्या बाबतीत कसलीही ढिलाई नाही. प्रत्येक गेटवर सुरक्षारक्षक हवाच. यानंतर सीसीटीव्हीवर आम्ही भर दिला. आता रुग्णालयाचा जवळपास ९५ टक्के परिसर हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. रुग्णालय परिसरातील गर्दी टाळणे ही एक महत्त्वाची बाब होती. त्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वाहनांची पार्किंग याचे शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणे महत्त्वाचे होते. यासाठी पार्किंग समितीची नियुक्ती केली आहे. नॉन कोविडमध्ये रुग्णांचा वेळ वाया न जाता त्यांना वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आमची टीम कार्यरत आहे. याचे सर्व नियोजन आम्ही करीत आहोत. सध्याच्या घडीला रुग्ण कमी आहेत, शिवाय मृत्यूदरही घटला आहे. समाधानाची बाब म्हणजे या रुग्णालयातून अगदी बारा दिवसांच्या बाळापासून ते १०७ वर्षांच्या आजींपर्यंत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
बेड साईड असिस्टंट संकल्पनेचे यश
कोविडमध्ये रुग्णांना मानसिक आधार हे मोठे औषध. यासह अतिदक्षता विभागात अनेक सेवा रुग्णांना जागेवर मिळत नसल्याने त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे अशा रुग्णांच्या सेवेसाठी बेड साईड असिस्टंट ही संकल्पना उदयास आली. आम्ही त्याच्यावर काम केले, तरुणांचे समुपदेशन केले. ते तयार झाले, त्यांना प्रशिक्षण दिले. सुरुवातीला अडचणी आल्या मात्र नंतर स्वयंस्फूर्तीने तरुणांनी या कामात स्वत:ला गुंतवून ठेवले. रुग्ण बरे करण्यात त्यांची मोलाची भूमिका राहिली. रुग्णांना वेळेवर औषधे देणे, वेळेवर जेवण, नाश्ता देणे, रुग्णांशी मनमोकळ्या गप्पा करून त्यांचा ताण हलका करणे, अशा सेवेमुळे अनेक रुग्ण हे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. रुग्णालयाचा रिकव्हरी रेट वाढला, डेथ रेट कमी झाला. ३० बेडसाईड असिस्टंट यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि मन लावून पार पाडली. याचे राज्यपातळीवर कौतुकही झाले. याचे सर्व श्रेय हे सर्व टीमला जाते. हे एकट्या व्यक्तीचे काम नाही.
अनेक पातळ्यांवर काम
आधुनिक मशिनरी आणून उपचार पद्धती अधिक सुलभ करण्यासाठी आमचा प्रयत्न राहिला व आगामी काळातही राहणार आहे. व्हेंटिलेटर्स, मॉनिटर, टेली आयसीयू अशा अनेक सुविधा मध्यंतरीच्या काळात रुग्णालयात उपलब्ध झाल्या आहेत. कक्षांमधील भंगारही बाहेर काढण्यात आले आहे. इतकेच नव्हे या भंगारात काही अत्यंत जुन्या मात्र महत्त्वाच्या मशिनरी सापडल्या. त्या भंगारात न फेकता त्यांची सजावट करून आम्ही दर्शनी भागात त्या लावल्या आहेत. यामुळे परिसराच्या सजावटीत भर पडली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक यांच्यात योग्य समन्वय राखून कार्य, कडक पारदर्शी सुरक्षा व्यवस्था उभारण्यावर भर, रुग्णांशी संवाद साधून अडचणी समजून घेतल्या. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा, मृत्यूचा नियमित आढावा घेऊन कुठे कमतरता आहे यावर काम केले. विविध समित्या नेमून कामात सुसूत्रता आणली.
आगामी नियोजन
रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तसा दीड तासात तो मोकळा व्हायला हवा, जेवढी गर्दी कमी करता येईल तेवढे आमचे प्रयत्न राहतील. रुग्णांना रुग्णसेवा सुटसुटीतपणे आणि वेळेवर मिळाल्यास त्याचा यंत्रणेवरील विश्वास वाढतो यावर काम करून असे नियोजन करायचे आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. आमची संपूर्ण टीम यावर काम करीत आहे.
डॉ. जयप्रकाश रामानंद
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय.
शब्दांकन : आनंद सुरवाडे.