प्रत्येक शिवसैनिक पदास लायक, विधानसभेचा उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील !
By सुनील पाटील | Published: September 16, 2023 05:37 PM2023-09-16T17:37:31+5:302023-09-16T17:38:39+5:30
महापौर जयश्री महाजन : महापालिका सोडताना जयश्री महाजन, कुलभूषण पाटील झाले भावूक
जळगाव : शिवसेनेत प्रत्येक शिवसैनिक पदास लायक असतो, पक्षप्रमुख जो आदेश देतात तो सर्वांना मान्य करण्याची पध्दत आहे. तेच सूत्र आगामी विधानसभेसाठी लागू राहणार आहे. पक्ष प्रमुख ज्यांना उमेदवारी देतील तो आमचा उमेदवार असेल असे सांगून मावळत्या महापौर जयश्री महाजन यांनी पक्षाने आदेश दिला तर विधानसभेची निवडणूक लढवू अशी सुप्त इच्छा शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
महानगरपालिकेची मुदत १७ सप्टेबर रोजी संपत असल्याने शनिवारी महापौर दालनात महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक किशोर बाविस्कर, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान उपस्थित होते. अडीच वर्षाच्या कार्यकाळात झालेली विकासकामे, आगामी काळात होऊ घातलेली कामे याबाबत त्यांनी माहिती दिली. महापालिकेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानुसार बांधकाम विभागामार्फत शहरात १०० कोटी व ८५ कोटीचे कामे पावसाळ्यानंतर सुरु होणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत शहरात रस्ते झालेले असतील. एक वेगळं चित्र तेव्हा असेल. महापालिकेत प्रथमच नगरसेवक निधीचा हेड तयार करुन अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकासाठी २५ लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली.
शरद पवार महाविकास आघाडीचे नेते
मध्यंतरी आपल्या निष्ठेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. ते आमच्या भागातूनच जाणार असल्याने शहराच्या प्रथम नागरिक या नात्याने त्यांना घरी येण्याचे निमंत्रण दिले. ते त्यांनी स्विकारले. आम्ही त्यांचा सत्कार केला. आपल्या घरी कोणीही मोठी व्यक्ती आली तर आनंद होतोच. यात निष्ठेबाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही.
मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते अनावरण करावा नियम नाही
राजशिष्टाचारानुसारच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याच हस्ते अनावरण करावे, असा कोणताही नियम नाही. कोणाच्या हस्ते अनावरण करावे याचे पूर्ण अधिकार महापालिकेला आहेत. मनपा ही स्वायत्त संस्था आहे. राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील तिन्ही मंत्री व शहराच्या आमदारांना निमंत्रण दिले होते. राजशिष्टाचार पाळला नाही असा आक्षेप घेणे चुकीचे नाही असेही महापौर म्हणाल्या.