हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:03 AM2021-01-05T04:03:23+5:302021-01-05T04:03:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर बंदी घातली असून, नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर बंदी घातली असून, नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या सुचनाही स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. असे असतानांही शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक ठिकाणी `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत नागरिक बिनधास्त धुम्रपान करतांना आढळून आले. स्थानिक प्रशासन व अन्न व औषध प्रशासनातर्फे धुम्रपान करणाऱ्यांवर तसेच गुटखा-तंबाखू विक्री करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून आले. शासनाने धुम्रपान करणाऱ्यांवर २०० रूपये दंडाची कारवाई फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहे.
`लोकमत` प्रतिनिधीने शनिवारी शहरातील नवीन बस स्थानक, रेल्वे स्टेशन, नुतन मराठा महाविद्यालय, टॉवर चौक, नेहरू चौक, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान आदी सार्वजनिक ठिकाणांची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी नागरिक अगदी बिनधास्तपणे बिडी, सिगारेट ओढतांना दिसून आले. विशेष म्हणजे गुटखा खाल्यानंतर बाजूलाच असलेल्या भिंती रंगवितांना दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धुम्रपान करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. नियम मोडणाऱ्या अशा नागरिकांवर मनपा व अन्न व औषध प्रशासनाला २०० रूपये दंडाची कारवाईचे अधिकार दिले आहेत. मात्र, संबंधित प्रशासनाकडून या ठिकाणी कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान परिसरातील एका पानटपरी चालकाने सांगितली की, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर आतापर्यंत कुठलीही कारवाई होतांना दिसून आली नसल्याचे सांगितले. तर काही नागरिकांनी २०० दंडाची खरोखर कारवाई होते का? याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.
इन्फो :
प्रशासनाकडून कारवाईचा फक्त कांगावा
शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिक बिनधास्तपणे धुम्रपान करित असून, याच ठिकाणी लपून-छपून दुकानांमध्ये गुटखा विक्री सुरू आहे. असे असतांना अन्न व औषध प्रशासनातर्फे धुम्रपान करणाऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसून, फक्त कारवाई सुरूच असल्याचा कांगावा करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली नाही.
इन्फो :
तर सर्वांना दंडाचे अधिकार प्राप्त
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाला अधिकार असून, हे अधिकारी पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनालाही अधिकार असल्याचे अन्न व औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आले. याबाबत मनपा आरोग्य विभागाकडे माहिती मागितली असता, त्यांनी याबाबत कारवाई होत असल्याचे सांगितले. मात्र, आता पर्यंत किती जणांवर कारवाई करण्यात आल्या, या बाबत सध्या माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
इ्न्फो :
बिडी आणि सिगारेट ओढण्याचे धोके मोठ्या प्रमाणात आहेत. फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असताे. तसेच शरिराची रोगप्रतिकारक शक्तीही धुम्रपानामुळे कमी होते. शरीरासाठी धुम्रपान हे धोक्याचेच असल्याचे शहरातील डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले.