सर्वसामान्यांशी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला अहवाल बाळगणे अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:58+5:302021-04-12T04:14:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत लागू निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ...

Everyone in contact with the public must report | सर्वसामान्यांशी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला अहवाल बाळगणे अनिवार्य

सर्वसामान्यांशी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला अहवाल बाळगणे अनिवार्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत लागू निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्पष्टीकरणात्मक आदेश काढले आहेत. त्यानुसार कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांशी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर किंवा अँटिजेन टेस्ट करून याबाबतचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य केले आहे. या अहवालाची वैधता १५ दिवस राहणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ३० एप्रिलपर्यंत लागू निर्बंधांबाबत स्पष्टीकरणात्मक आदेश काढले आहेत.

खासगी कार्यालयातील कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक यांच्याशी संबंधित कर्मचारी, फिल्म, सिरियल, जाहिरातींशी संबंधित कर्मचारी, होम डिलिव्हरी सुविधा पुरविणारे कर्मचारी, विविध परीक्षेचे आयोजनाशी संबंधित कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, खाद्यपदार्थ विक्रेते, औद्योगिक निर्मिती करणाऱ्या घटकात काम करणारे कामगार, कर्मचारी स्टाफ, संबंधित कर्मचारी, ई-कॉमर्समधील कर्मचारी, बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, आरबीआय संलग्न कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण न केल्यास त्यांना अँटिजेन टेस्ट करून चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे अनिवार्य राहणार आहे; मात्र चाचणी करताना कोविडसदृश लक्षणे असल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आदेशात म्हटले आहे.

सेतू सुविधा केंद्र सुरू

आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, सीएससी सेंटर्स, पासपोर्ट सेवा केंद्र हे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत सुरू ठेवता येणार आहे.

सर्व वृत्तपत्रे (मासिके, जनरल नियतकालिके) हे दररोज सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत वितरित करता येतील. तथापी, संबंधित आस्थापनाशी निगडीत ४५ वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच घरपोच अंक वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे.

पशु अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी

व्हेटर्नरी हॉस्पिटल, निर्मल केअर सेंटर, पेट शॉप हे दररोज सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत सुरू राहतील. तसेच अंडी, चिकन, मासे, मटण, जनावरांचा चारा इत्यादी विक्री करणारी दुकाने आणि या सर्व बाबीकरिता आवश्यक असलेला कच्चा माल पुरवठा करणारी दुकाने, गोदामे व वाहतूक व्यवस्था, पाळीव प्राण्यांच्या नैसर्गिक विधीसाठी, व्यायामासाठी घराबाहेर घेऊन जाण्यासाठी तसेच प्राणी कल्याणाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या व जीवनावश्यक असलेल्या पशु अन्नपदार्थांची विक्री करणारी दुकाने दररोज सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू ठेवता येतील.

संबंधित आस्थापनाशी निगडीत सर्व ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे तसेच घरपोच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे, याची वैधता १५ दिवस राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास शिक्षेस पात्र राहतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाद्वारे दिला आहे.

Web Title: Everyone in contact with the public must report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.