प्रत्येकाने आपल्या वया इतक्या वृक्षांचे रोपण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:01+5:302021-09-25T04:17:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ऑक्सिजन हा वृक्षांमधून मिळतो. प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने प्रत्येकाने आपल्या वयाच्या संख्ये इतक्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ऑक्सिजन हा वृक्षांमधून मिळतो. प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने प्रत्येकाने आपल्या वयाच्या संख्ये इतक्या वृक्षांचे रोपण करावे, असे आवाहन देवराई प्रकल्पप्रमुख व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिरवाई’ या प्रकल्पांतर्गत मेहरुण तलाव परिसरात एक हजार एक झाडे लावली जाणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ शुक्रवारी मेहरुण तलाव परिसरात करण्यात आला.
यावेळी महापौर जयश्री महाजन, मराठी प्रतिष्ठानचे प्रवर्तक विजय वाणी व मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, नगरसेविका अॅड शुचिता हाडा, दीपमाला काळे यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन त्रिवेणी वड, पिंपळ व उंबराचे झाड लावून करण्यात आले. यावेळी ‘वडाच्या, आंब्याच्या नावानं चांग भलं’ च्या घोषणा देत वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान, ‘मराठी प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने साकारला जाणारा हा सहावा प्रकल्प आहे.
एक हजार झाडे लावण्याचा संकल्प
महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्यात ‘हिरवाई’ प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड व संवर्धनासंदर्भात करारही झालेला आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. त्या अंतर्गत करंज, कडुनिंब, वड, पिंपळ, आवळा, चिंच, अमलतास, बहावा, कदंब आदी विविध जातींच्या रोपांचा समावेश आहे. या एक हजार एक झाडांसाठी संपूर्णपणे खड्डे खोदून रोपट्याला काटेरी कुंपण टाकण्याचे कामही सुरू झाले आहे. आपल्या आयुष्यात झाडांचे खूप महत्व असून ऑक्सिजन निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात या उपक्रमाच्या माध्यमातून रोपवाटिका तयार करण्यात येणार असून त्यातून प्रत्येक गावात विद्यार्थ्यांद्वारे शंभर झाडे लावण्याचा मानस असल्याचे या कार्यक्रमाप्रसंगी आयोजकांनी सांगीतले.