मंदिरातील गणेशमूर्तीचे समोर आलेले मूळ रूप पाहून सगळेच थक्क
By अमित महाबळ | Published: September 3, 2022 07:49 PM2022-09-03T19:49:13+5:302022-09-03T19:50:35+5:30
कालिका माता मंदिराच्या दक्षिण बाजूला महामार्गालगत ४० वर्षांपासून एक छोटे गणेश मंदिर होते
अमित महाबळ
जळगाव : पोतंभर शेंदूर हटविल्यानंतर समोर आलेले गणेशमूर्तीचे मूळ रूप पाहून सगळेच थक्क झाले. कोणालाही विश्वास बसत नव्हता, की शेंदुराच्या लेपाखाली एवढी सुंदर मूर्ती लपलेली असेल. योगेश्वरनगरमध्ये गेल्याच वर्षी तपस्या विघ्नहर्ता मंदिरात स्थापन झालेल्या मूर्तीची ही रंजक कथा आहे.
कालिका माता मंदिराच्या दक्षिण बाजूला महामार्गालगत ४० वर्षांपासून एक छोटे गणेश मंदिर होते. जगन्नाथ खडसे व सहकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका साधूने आठवडे बाजारातून या मंदिरातील मूर्ती आणली होती. तो बरेच दिवस त्या ठिकाणी राहिला आणि अचानक एके दिवशी निघून गेला. नंतर त्याची काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यानच्या काळात लोकसहभागातून गणपतीचे छोटे मंदिर साकारले गेले. महामार्गाच्या कामात हे मंदिर जाणार होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही मूर्ती दुसरीकडे स्थापित करावी, अशी विनंती रहिवाशांना केली होती. योगेश्वर नगरमधील रहिवाशांनी निर्णय घेतला आणि खुल्या भूखंडात मंदिर बांधून मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्याचे ठरले. ज्या साधूने एका हातात धरून मूर्ती आणली होती, तीच उचलून आणण्यासाठी चार ते पाचजण लागले.
अखंड पाषाणातील मूर्ती
मूर्ती आणल्यावर धार्मिक विधी करण्यापूर्वी शेंदूर हटविण्याचे काम सुरू झाले. पोते भरून थर बाजूला निघाल्यावर मूर्तीचे मूळ समोर आले आणि ते पाहून सगळेच थक्क झाले. एवढी सुंदर मूर्ती असेल याची पूर्वकल्पना कोणालाच नव्हती. अखंड काळ्या पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. लोकवर्गणी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने तपस्या विघ्नहर्ता मंदिर उभारण्यात आले. ७ जून २०२१ रोजी, गणेशमूर्ती स्थापित करण्यात आली.
खुल्या भूखंडाचेही रुपडे पालटले
मंदिराच्या प्रांगणात शंकराची पिंडी व इतर मूर्ती आहेत. अनेक झाडे लावली आहेत. भाविकांना बसण्यासाठी बाक आहेत. हे मंदिर होण्यापूर्वी खुल्या भूखंडात बरीचे झुडपे, गवत वाढलेले होते. मोठा खड्डा होता. तो समतल करण्यासाठी भराव घालावा लागला. मात्र मंदिरामुळे या जागेचेही रूपडे पालटले आहे.