"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही"

By अमित महाबळ | Published: March 24, 2023 04:46 PM2023-03-24T16:46:06+5:302023-03-24T16:48:15+5:30

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते.

"Everything cannot be freed by leaving it to the army or the government.", sanjay agrawal brigadier | "प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही"

"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही"

googlenewsNext

अमित महाब‌ळ 

जळगाव : देशाच्या सुरक्षिततेसाठी केवळ सैन्य किंवा सरकारवर जबाबदारी टाकून मोकळे होता येणार नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, असे प्रतिपादन भारताच्या गृह मंत्रालयाचे माजी सुरक्षा सल्लागार व सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचे माजी अध्यक्ष बिग्रेडीयर संजय अग्रवाल यांनी केले. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला व मानव्यविद्या प्रशाळा अंतर्गत संरक्षणशास्त्र विभाग आणि विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘काश्मीरबाबत चीनचे धोरण’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ब्रिगेडीअर संजय अग्रवाल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा. एस.टी.इंगळे होते. मंचावर युआयसीटीचे संचालक डॉ. जे. बी. नाईक, प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. अनिल चिकाटे, समन्वयक प्रा. तुषार देशपांडे व समन्वयक सचिव डॉ. तुषार रायसिंग उपस्थित होते.    

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्यावेळी नागरिकांकडून इंटरनेटची सुविधा पुरवून देशकार्याला हातभार लावला गेला. सामान्य नागरिकांच्या सहभागाने देशाच्या रणनितीची प्रतिमा तयार होत असते. तरुणांनी आपल्या बौध्दिक विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले. 

अध्यक्षीय भाषणात प्रा. एस. टी. इंगळे यांनी देशाच्या सीमेवर अस्वस्थता माजवली जाते. दहशतवादामुळे सीमेवरचे प्रश्न चिघळत असतात. काळाच्या ओघात युध्दांमध्येही आता बदल झाले आहेत. जैविक शस्त्रे वापरली जातात. या सगळ्या पार्श्वभूमीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या परिसंवादाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. आभार प्रा.वीणा महाजन यांनी मानले. दुपारच्या सत्रात दक्षिण कोरीयाच्या एशिया इन्स्टिट्यूट, सेऊलचे संचालक डॉ. लखविंदर सिंग, इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअरर्सच्या डॉ. अनघा गुहा रॉय, पुणे येथील शैबल बॅनर्जी यांची व्याख्याने झाली.  

चीन भूभाग वाढविण्याच्या प्रयत्नात

उद्घाटनानंतरच्या बीजभाषणात अग्रवाल यांनी काश्मीरसाठी चीनची धोरणात्मक योजना कशी आहे यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे प्रकाश टाकला. चीन भूभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर चीनने विरोध दर्शविला. कुरापती काढण्यात चीनसोबत भारताच्या शेजारी देशांचाही सहभाग आहे. भारत अत्यंत शांतपणे मात्र रणनितीने प्रत्युत्तर देत आहे. कोणाच्याही अधिपत्याखाली न जाता भारत स्वत:चे स्थान आणि अधिपत्य घडवत आहे असे ते म्हणाले. राष्ट्रीय इच्छाशक्ती, राष्ट्रीय हेतू आणि राष्ट्रीय क्षमता यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: "Everything cannot be freed by leaving it to the army or the government.", sanjay agrawal brigadier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.