‘ईव्हीएम’चा बैलगाडीने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:37 PM2019-10-20T23:37:27+5:302019-10-20T23:37:33+5:30
सात्री गावात पुन्हा वाढली पातळी : मूलभूत सुविधांसाठी खडतर प्रवास
अमळनेर : तालुक्यातील सात्री हे गाव बोरी नदीला आलेल्या पुरामुळे दीड महिन्यापूर्वी वेढले गेले. मात्र तेथील ग्रामस्थांचे हाल अद्याप कायम असून रविवारी बैलगाडीने निवडणूक कर्मचारी या गावात पोहचले. मात्र तासाभरात नदीला पूर आल्याने पुन्हा गैरसोय होण्याची शक्यतात आहे.
अमळनेर ते सात्री गावाचे अंतर १८ किलोमीटर आहे. येथून मारवड मार्गे डांगरी प्र. गावातून सात्रीला बोरी नदीचे पात्र ओलांडत जावे लागते. पावसाळ््यात पाण्याचा जोर जास्त वाढल्याने या गावातून रुग्णांना लाकडी खाटेवर बसवून ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागत होते.
५ सप्टेंबर पासून बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटला होता. या गावचे पुनर्वसन होणार असल्याने या गावाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. निवडणूक कर्मचारी एक तास उशिरा गेले असते तर बैलगाडीने सुद्धा पोहचविणे अशक्य झाले असते.
सहा वर्षात बोरी नदीला पूर आला नव्हता म्हणून समस्येचा विसर पडला होता. मात्र यंदा जोरदार पावसाने अद्यापही नदी वाहत आहे. त्यामुळे बस गावात जाऊ शकत नाही.
पाण्यातून वाट काढत लोक ये-जा करतात. मतदान केंद्रावर कर्मचारी २० रोजी बैलगाडीने पाचले खरे, पण त्यानंतर तासाभराने नदीला पूर आल्याने पुन्हा गैरसोय होण्याची शक्यता बळावली आहे.
अवघ्या एक तासात पाण्याची पातळी इतकी वाढली की बैलगाडीने जाणेसुद्धा अवघड झाले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पाण्याची पातळी कमी न झाल्यास कर्मचाऱ्यांना खाटेद्वारे किवा बोटीवर आणावे लागेल. काही मतदार इतरत्र स्थलांतरित झाल्याने त्यांना मतदानासाठी असुविधा होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.
सात्री येथे दैनंदिन कामकाजासाठी बाहेरगावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी जायचे असल्यास नदीपात्रातूनच जावे लागते. दुष्काळी कालावधी वगळता नदीला पाणी असते. त्यामुळे रात्रीबेरात्री गावाबाहेर जाण्याची वेळ आल्यास ग्रामस्थांची तारांबळ उडते. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पूरस्थितीमध्ये शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागते. अनेक वर्षांपासून पुनर्र्वसन प्रलंबित आहे. त्याबाबत अनिश्चतता असल्याने त्वरित पूल बांधण्यात यावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.