फैजपूरचा ‘मधुकर’ भाडेतत्त्वावर देण्यासाठी आजी-माजी संचालकांची सहमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:28 PM2019-11-24T18:28:00+5:302019-11-24T18:38:31+5:30
मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक, कामगार, वाहतूक, व्यापारी व अन्य घटकांचे मागील देणी व भविष्यात या घटकांच्या हिताचा विचार करता कारखाना भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय रविवारी आजी-माजी संचालकांच्या बैठकीत घेण्यात येऊन त्याला सहमती दर्शविण्यात आली.
वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक, कामगार, वाहतूक, व्यापारी व अन्य घटकांचे मागील देणी व भविष्यात या घटकांच्या हिताचा विचार करता कारखाना भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय रविवारी आजी-माजी संचालकांच्या बैठकीत घेण्यात येऊन त्याला सहमती दर्शविण्यात आली व योग्य धोरणात्मक निर्णय घेऊन त्यासंबंधीचा निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येईल. यावर एकमत झाल.े या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते.
आर्थिक अडचणींमुळे मधुकर सहकारी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होईल की नाही याबद्दल साशंकता असताना आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आजी-माजी संचालक व परिसरातील लोकप्रतिनिधींची बैठक रविवारी मधुकर कारखान्यात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत ऊस उत्पादकांची एफआरपीची रक्कम, कामगार पगार, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांची बिले, पीएफ, ठेवी अशा व अन्य अत्यावश्यक देणी अदा करणे. तसेच गाळप हंगाम २०१९-२० साठी ५० ते ५५ हजार टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. हंगाम घेणे अत्यंत कठीण असल्याने कारखान्यांपुढे कारखाना भाडेतत्त्वावर, सहयोगी तत्वावर अथवा भागीदारी तत्त्वावर देण्यासंबंधी या बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली व त्यात वरील निर्णय घेतल्याशिवाय देणी अदा करणे शक्य नसल्याचे लक्षात आणून देण्यात आले
कारखान्याशी संबंधित सर्व घटकांच्या हिताचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच त्यासाठी संबंधितांचे कायदेशीर मार्गदर्शन व धोरणात्मक मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेची संमती यावरही चर्चा झाली
तसेच योग्य धोरण ठरवून पुढील बैठकीत याचा निर्णय घ्यावा, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
बैठकीस व्हाईस चेअरमन भागवत पाटील, संचालक नथ्थू तडवी, बारसू नेहते, लीलाधर चौधरी, सुरेश पाटील, मिलिंद नेहते, अनिल महाजन, निर्मला महाजन, शैलेजा चौधरी, प्रशांत पाटील, रमेश महाजन, नितीन चौधरी, माधुरी झोपे, शालिनी महाजन, गणेश नेहते, नरेंद्र नारखेडे, माजी आमदार तथा संचालक अरुण पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी यांच्यासह माजी संचालक भास्करराव चौधरी, नितीन राणे, चतुर्भुज खाचणे, रोहिदास ढाके, किशोर तळेले, सुरेश धनके, माजी आमदार रमेश चौधरी, उल्हास चौधरी, पुरुषोत्तम महाजन, प्रभाकर सरोदे, संजय राणे, डॉ.आर.एम.चौधरी, विश्वनाथ चौधरी, दिनकर पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक पिसाळ व सचिव तेजेंद्र तळेले आदी उपस्थित होते.
या बैठकीला विभागाच्या खासदार रक्षा खडसे, विद्यमान आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार तथा कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांची उपस्थिती राहणार होती. मात्र काही कारणास्तव तिघेही अनुपस्थित होते.