शेगाव येथे दर्शनाला गेलेल्या जळगावात माजी सैनिकाकडे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 09:35 PM2018-02-12T21:35:18+5:302018-02-12T21:37:36+5:30
कुटुंबासह शेगाव येथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेले माजी सैनिक अरुण हिरामण वाघ (वय ३८ रा. भास्कर हौसिंग सोसायटी, शिवकॉलनी, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५१ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : कुटुंबासह शेगाव येथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेले माजी सैनिक अरुण हिरामण वाघ (वय ३८ रा. भास्कर हौसिंग सोसायटी, शिवकॉलनी, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५१ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अरुण वाघ हे माजी सैनिक असून सध्या एका खासगी संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत आहेत. १० फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता पत्नी शोभना, आई लिलाबाई, मुलगा प्रथम,मुलगी भाग्यश्री असे शेगाव येथे गेले. तेथे गजानन महाराजांचे दर्शन आटोपून हे कुटुंब ११ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घरी परतले असता घराचे कुलुप जिन्यात आढळून आले तर दरवाजा अर्धवट उघडा होता.घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता. घरातील तिन्ही लोखंडी कपाट उघडे होते तर बेडरुममधील कपाटही उघडे होते.
असा गेला मुद्देमाल
१८ हजार रुपये किमतीची १० ग्रॅमची सोनसाखळी, ७ हजार २०० रुपये किमतीचे ४ ग्रॅमचे कानातील सोन्याचे टॉप्स, ९ हजार किमतीचे ५ ग्रॅमचे कानातील दुसरे टॉप्स, ३ हजार ६०० रुपये किमतीची सोन्याची चिप्स, १२ हजार ६०० रुपये किमतीच्या सोन्याच्या २ अंगठ्या व ६ हजार ६०० रुपये किमतीची चांदीची लक्ष्मीची प्रतिमा असा एकुण ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. याप्रकरणी अरुण वाघ यांनी सोमवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार गोपाळ चौधरी करीत आहेत.