संपूर्ण तयारीने परीक्षा देता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:55+5:302021-04-13T04:15:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य असून स्वागतार्ह आहे. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य असून स्वागतार्ह आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळणार आहे व संपूर्ण तयारीने विद्यार्थी परीक्षा देतील, असा सूर विद्यार्थी व शिक्षकांमधून उमटला.
दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोरील चित्र स्पष्ट झाले आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याचा शासनाचा निर्णय सध्याची कोविड महामारीची गंभीर परिस्थिती पाहता योग्य आणि अपरिहार्य आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांची सुरक्षितता आदी बाबी लक्षात घेऊन शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो.
- संदीप पवार, जिल्हा कार्याध्यक्ष, शिक्षकसेना
========
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होईल. त्या करिता परीक्षा पुढे घ्याव्यात अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री व वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. त्या मागणीचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- सोमनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती प्राथ.जळगाव
======
दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे आता तो संभ्रम दूर झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी अजून वेळ मिळणार आहे.
- वेदांत पवार, विद्यार्थी
========
परीक्षेच्या तारखा जाहिर झाल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव बघता परीक्षा होतील की नाही, असा सुध्दा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये होता. आता परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा अभ्यासाला वेळ मिळणार आहे. शाळांकडून देखील सराव करून घेतला जात आहे. संपूर्ण तयारीने परीक्षा देता येईल.
- सागर पाटील, विद्यार्थी