परीक्षा "वस्तुनिष्ठ", बहुपर्याय गलबलाविना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 06:08 PM2020-09-08T18:08:09+5:302020-09-08T18:22:06+5:30

विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा : "लेखी"चाही अपवाद

Exam "objective", without multiple choice! | परीक्षा "वस्तुनिष्ठ", बहुपर्याय गलबलाविना !

परीक्षा "वस्तुनिष्ठ", बहुपर्याय गलबलाविना !

Next

जळगाव – कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या,  अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांसह प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने केले जाणार असून अपवादात्मक परिस्थितीतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देता येणार आहे. १५ सप्टेंबर ते  २५ सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील व १ ऑक्टोबर पासून लेखी परीक्षा होऊन ३१ ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील. विशेष म्हणजे या लेखी परीक्षा वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी असणार आहे.  

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक  बी.पी. पाटील यांनी या परीक्षांच्या स्वरूपाविषयी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या,  अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले होते. राज्यशासनाने या परीक्षांचे स्वरूप ठरविण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाने स्थानिक पातळीवर परीक्षा आयोजन व वेळापत्रक निश्चित करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारशींचा अहवाल ५ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या विद्यापरिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि व्यवस्थापन परिषद या प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यामध्ये या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने व वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी घेण्याचा निर्णय झाला. पदवी परीक्षांसाठी ६० गुणांची परीक्षा राहणार असून परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांची असेल. तर  पदव्युत्तर परीक्षेसाठी ६० गुणांची परीक्षा व १२० मिनिटांचा कालावधी असेल. प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील. प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबर पासून सुरु होतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळा‍वर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.  

 - परीक्षांचे स्वरूप पुढील प्रमाणे :

 - प्रात्यक्षिकपरीक्षा :
पदविका, पदवी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील,  अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाद्वारे घेण्यात येत असलेल्या प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २९ एप्रिल, २०२० च्या मार्गदर्शक सूचनेतील अ.क्र. ११, राज्यस्तरीय समितीच्या ०८ मे, २०२० च्या शिफारशींमधील अ.क्र. ४ मधील आणि राज्यस्तरीय समितीच्या दि. ०२ सप्टेंबर, २०२० च्या शिफारशींमधील मुद्दा क्र. ४ व ५ मध्ये नमूद केल्यानुसार महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहे.  
प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन हे विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्यस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्यायाप्रमाणे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष न बोलावता त्याचे मूल्यमापन हे दि. १३ मार्च, २०२० पर्यंत संबंधित विषयांचे नियमित झालेले प्रात्यक्षिके, जर्नल्स, टर्मवर्क, अंतर्गत मौखिक परीक्षा, विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती अथवा अभ्यासक्रमात नमूद तत्सम तरतुदी यांच्या आधारे व Online माध्यमातून, दूरध्वनीद्वारे संपर्क करून प्रात्यक्षिकावर आधारीत मौखिक परीक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांचे  मूल्यमापन केले जाईल. 

 
- ज्या अभ्यासक्रमांतर्गत मौखिक परीक्षा किंवा प्रकल्प अहवालावर (Project) आधारीत मौखिक परीक्षा आहे, त्यांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न बोलविता दूरध्वनीद्वारे मुलाखत, स्काईप किंवा इतर ऑनलाईन माध्यमाद्वारे PPT सादरीकरणाद्वारे करता येईल. ज्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प अहवाल जमा झालेले नसतील त्यांचे सॉफ्टकॉपीच्या आधारे अभ्यासक्रमामधील नमूद आराखड्याप्रमाणे मूल्यमापन करण्यात येईल.  
अंतिम वर्षातील पूनर्परीक्षार्थी (Backlog) विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे व पद्व्युत्तर वर्गाच्या प्रकल्पाचे मूल्यमापन देखील वरील प्रमाणे करण्यात येईल. 
महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर जाहीर करावे, असे आवाहन विद्यापीठने केले आहे.

- लेखी परीक्षा :
 विद्यापीठ अधिकार मंडळांनी मान्य केल्याप्रमाणे लेखी परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपात बहुपर्यायी (MCQ – Multiple Choice Question) राहणार असून पदवीस्तरावरील परीक्षांसाठी ६० गुणांची परीक्षा ही ९० मिनिटांची राहील व प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. तसेच पदव्युत्तर स्तरावरील परीक्षांसाठी ६० गुणांची परीक्षा ही १२० मिनिटांची राहील व प्रत्येक प्रश्नाला एक गुण राहील.  

- अभियांत्रिकी व तांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विधी, शिक्षणशास्त्र व शारिरीक शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र या अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष / अंतिम सत्रातील नियमित व Backlog सह (ATKT) विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर न बोलविता Online पध्दतीने Laptop / Desktop with web camera / Smart Phone याद्वारे घेण्यात येईल. 

-  कला, विज्ञान, वाणिज्य आणि समाजकार्य या अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष / अंतिम सत्रातील नियमित व Backlog सह (ATKT) विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर न बोलविता Online पध्दतीने Laptop / Desktop with web camera / Smart Phone  याद्वारे परीक्षा घेण्यात येईल.  

- तसेच ज्या विद्यार्थ्यांना Online परीक्षांच्या सुविधांबाबत अडचणी असतील अशा विद्यार्थ्यांना नातलग /मित्र यांच्या माध्यमातून सदर साधने उपलब्ध करून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असे सुचित केले जाईल. ही साधने उपलब्ध होत नसल्यास परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन OMR वर आधारीत MCQ परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.  याकरीता विद्यार्थ्यांना सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या परीक्षांसाठी सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे विकल्प (Option) ची माहिती Soft कॉपीमध्ये आठ दिवसात संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून घेतली जाईल. 

-  बी.एफ.ए. , एम.एफ.ए. , आर्किटेक्चर अशा कौशल्यावर आधारित (Skilled Based) अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा कालावधी जास्त असल्याने Online परीक्षा घेणे शक्य नाही. अंतिम वर्ष / अंतिम सत्रातील नियमित व Backlog सह (ATKT) विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन पारंपरिक पध्दतीने केले जाईल. त्यासाठी महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात येवून परीक्षा केंद्रावर न बोलविता परीक्षा घेण्यात येईल.  

-  जे विद्यार्थी अपवादात्मक परिस्थितीत Offline पर्याय निवडतील त्यांच्या Offline पध्दतीच्या परीक्षांचे आयोजन हे महाराष्ट्र शासन , विद्यापीठ अनुदान आयोग, आरोग्य मंत्रालय यांनी कोविड -१९ बाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शारीरिक अंतर राखून, विद्यार्थ्यांची सुरक्षा व परीक्षांचे पावित्र्य राखून महाविद्यालयांकडून करण्यात येईल.  

- Offline पध्दतीने आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांबाबत स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (जिल्हाधिकारी ) व पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांना अवगत करून त्यांच्या सहकार्याने या परीक्षा घेण्यात येतील. 

- दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे सोयी सवलती दिल्या जातील. 

- अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा या दि. १३ मार्च, २०२० पर्यंत शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत होतील. 

- अंतिम वर्ष / अंतिम सत्रातील प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या Backlog (ATKT) विषयांच्या परीक्षा या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत असतील. या परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपातील (MCQ) प्रश्नपत्रिका तयार करून आयोजित करण्यात येतील. 

-कोणत्याही कारणास्तव जे विद्यार्थी  परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली जाईल व त्यासाठी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन करण्यात येईल. 

- विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण व अध्ययन विभाग (DEEL) अंतर्गत प्रवेशित बहिस्थ अभ्यासक्रमांच्या परीक्षा MCQ प्रश्नपत्रिका तयार करून आयोजित करण्यात येतील व या अंतिम वर्ष / अंतिम सत्रातील नियमित व Backlog सह (ATKT) विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर न बोलविता घरी राहून Online पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा Laptop / Desktop with web camera / Smart Phone याद्वारे घेण्यात येईल.  

- परीक्षांचा कालावधी व वेळापत्रक 
प्रात्यक्षिक परीक्षा या १५ सप्टेंबर पासून ते २५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येतील. 
लेखी परीक्षा विद्यापीठाच्या वेळापत्रकाप्रमाणे घेऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबर, २०२० पर्यंत करण्यात येईल (संदर्भ - महाराष्ट्र शासनाच्या संचालनालयाचे पत्र क्र. युएनआय/२०२०/ बैठक/ विशि-१/५६४०-A, दि. ३ सप्टेंबर, २०२०) 
काही अपवादात्मक‍ परिस्थितीत सर्व परीक्षा व त्यांचे निकाल दिलेल्या तारखेपर्यंत जाहीर करणे शक्य झाले नाही तर कुलपती व शासनाकडे मुदतवाढीसाठी विनंती करण्यात येईल. 

- लेखी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www:nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाईल. 

 - परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निराकारण करण्यासाठी Helpline सुरु करण्यात येणार आहे.

Web Title: Exam "objective", without multiple choice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.