म्युकरमायकोसिसच्या ६ मृत्यूचे परीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:52+5:302021-05-17T04:14:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : म्युकरमायकोसिसने मृत्यू झालेल्या ६ रुग्णांच्या मृत्यूचे एका चार सदस्यीय समितीने परीक्षण केले असून, याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : म्युकरमायकोसिसने मृत्यू झालेल्या ६ रुग्णांच्या मृत्यूचे एका चार सदस्यीय समितीने परीक्षण केले असून, याची कारणे व रुग्णांचा इतिहास यावर अभ्यास करून, याचा अहवाल दाेन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सुपुर्द केला आहे. यात स्टेरॉइड सुरू असणे, रुग्णांना मधुमेह असणे, त्यांची प्रतिकारक्षमता कमी असणे, ही कारणे समोर आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात शासकीय यंत्रणेत म्युकरमायकोसिसच्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूच्या परीक्षणासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी डॉ.यू.बी. तासखेडकर यांच्यासह डॉ.इम्रान तेली आणि एक सदस्य अशांनी या सर्व मृत्यू झालेल्या रुग्णांचे केसपेपर तपासले, त्यांना कोरोनाची लागण कधी झाली, त्यांची माहिती करून त्याची कारणे काय आणि भविष्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांबाबत काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावर भाष्य केले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सद्या म्युकरमायकोसिसचे ५ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, त्यांना कोरोनाची लागण असल्याने प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर आधी कोरोनाचे उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली हे रुग्ण असल्याचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
लवकर निदान आवश्यक
प्रतिकारक्षमता कमी असलेल्या, अन्य व्याधी असलेल्या रुग्णांना याची लागण होते. वेळेवर निदान झाल्यास ओषधोपचाराने तो नियंत्रणात येऊ शकतो, असे समितीने नोंदविल्याची माहिती आहे.
आता जिल्ह्याचा टास्क फोर्स
म्युकरमायकोसिसचे रुग्ण किती, त्यांची नेमकी परिस्थिती कशी, काय उपाययोजना करता येतील, यासाठी जिल्ह्यासाठी एका टास्कफोर्सची नियुक्ती येत्या दोन दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिली. यात एक कान, नाक, घसा तज्ज्ञ, एक रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट यांच्यासह खासगी डॉक्टरांचा यात समावेश राहणार आहे, अशी माहिती डॉ.चव्हाण यांनी दिली.