पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १८ मेपासून परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:20+5:302021-05-13T04:16:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.एस.डब्ल्यू., एम.ए.(एम.सी.जे.), एम.बी.ए., एम.एम.एस. (कॉम्प्युटर मॅनेजमेंट), एम.सी.ए., एम.सी.ए. इंटिग्रेटेड पदव्युत्तर अभ्यसक्रमाच्या प्रथम वर्ष प्रथम सत्रास प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांच्या आणि प्रथम वर्ष इंजिनिअरिंग सत्र १, व्दितीय वर्ष इंजिनिअरिंग सत्र ३, बी.फार्मसीचे सत्र १ आणि ३ आणि विद्यापीठ प्रशाळातील पदव्युत्तर वर्गांच्या सत्र १ या सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा ऑनलाइन पध्दतीने १८ मेपासून प्रारंभ होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सॉफ्टवेअरच्या हाताळणी व सरावाकरिता सराव चाचण्यांना सुरुवात झाली आहे.
वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे परीक्षेचे स्वरूप असून, पदवीस्तरावरील परीक्षेसाठी ९० मिनिटे व पदव्युत्तरस्तरासाठी १२० मिनिटे असा कालावधी राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे अतिरिक्त वेळ दिला जाईल. ज्या विषयाच्या वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेत ६० प्रश्न असतील यातील कमीत कमी ४० प्रश्न सोडवायचे आहेत तर ज्या प्रश्नपत्रिकेत ४० प्रश्न असतील त्यापैकी विद्यार्थ्यांनी कोणतेही ३० प्रश्न सोडवायाचे आहेत. ज्या प्रश्नपत्रिकेत ३० प्रश्न असतील त्यापैकी कोणतेही २० प्रश्न सोडवायचे आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
घाबरू नका... आयटी समन्वयक आहेत मदतीला...
ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना डेस्कटॉप, लॅपटॉप, स्मार्टफोनचा वापर करता येईल. या परीक्षांसाठी मागील परीक्षेत नियुक्त केलेल्या आयटी समन्वयकांची नियुक्ती या परीक्षेकरिता कायम ठेवण्यात आली आहे. तांत्रिक व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काय केले पाहिजे याच्या मार्गदर्शक सूचना परीक्षार्थींना देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लॉगइन होण्यासंदर्भात माहिती देणारा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे व माहितीपुस्तिकादेखील देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वतीने सरावासाठी मॉकटेस्ट घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व प्रवेशपत्र (हॉलतिकीट) वरील विषयांप्रमाणे परीक्षा द्यावी, असेही विद्यापीठाने कळविले आहे.
विंडो कालावधी तीन तासांचा...
विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना ऐनवेळी उदभवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक व्यत्ययाची भीती बाळगू नये. कारण या विद्यार्थ्यांना विंडो कालावधी तीन तासाचा दिला जाणार आहे.
व्यत्यय आलाय...तर असे करा....
परीक्षा देताना ऐनवेळी वीजपुरवठा खंडीत झाला अथवा काही तांत्रिक व्यत्यय आला तर कसे होईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्या दृष्टीकोनातून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी काही तांत्रिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://nmu.unionline.in या लिंकवर जाऊन त्या ठिकाणी विचारण्यात आलेला यूझर आयडी व पीआरएन क्रमांक टाकावा. पासवर्डसाठी विद्यार्थ्याची जन्मतारीख हीच विद्यार्थ्याचा पासवर्ड आहे. त्यानंतर ॲक्टिव टेस्टवर क्लिक करून आपली विद्याशाखा आणि प्रोग्रॅम नेम निवडायचा आहे. तो क्लिक केल्यानंतर शेवटी कोर्स कोड, सबजेक्ट नेम हे आपल्या हॉल तिकीटावर दिल्याप्रमाणे निवडायचे आहे. त्यानंतर परीक्षेसाठी विद्यार्थी लॉग इन होईल. लॉग इन यशस्वी झाल्यानंतर फोटो ओळखपत्राची पडताळणी होईल व या पडताळणीनंतर परीक्षेला प्रारंभ होईल. लॉग इन करताना अयशस्वी झाल्यास विद्यार्थ्याने आपला पासवर्ड हा बिनचूक आहे की नाही याची पडताळणी करावी. त्यानंतरही लॉग इन होत नसल्यास संकेतस्थळाच्या प्रशासकांशी परीक्षार्थी हा चॅटबोटद्वारे तत्काळ संपर्क साधू शकतो. त्याच्या शंकेचे लगेच निरसन केले जाईल. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्याने ट्रबल लॉग इगचा पर्याय निवडावा त्यामध्ये विद्यार्थ्याने आपला पीआरएन क्रमांक टाकावा विद्यार्थ्याच्या नोंदणी केलेल्या मोबाइलवर ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी टाकल्यानंतर विद्यार्थी परीक्षेसाठी लॉग इन होईल. हा पर्यायदेखील यशस्वी झाला नाही तर विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या असलेल्या आय.टी. समन्वयकाशी तत्काळ संपर्क साधावा. त्या विद्यार्थ्याच्या शंकेचे निरसन केले जाईल. प्रश्नाचे उत्तर निवडताना ए,बी,सी,डी समोरील रेडिओ बटनावर क्लिक करावे. या पध्दतीने परीक्षा दिली तर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. प्रश्नपत्रिका सोडवत असताना वीजपुरवठा खंडित झाला अथवा काही तांत्रिक व्यत्यय आला तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचा उर्वरित कालावधी दिला जाणार आहे. परीक्षार्थींचा विंडो कालावधी तीन तासाचा असणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी दिली.