५ जानेवारीपासून होणा-या परीक्षा ‘ऑनलाईन’च !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 07:54 PM2020-12-16T19:54:33+5:302020-12-16T19:54:43+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था आणि विद्यापीठ प्रशाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त परिसंस्था आणि विद्यापीठ प्रशाळांमधील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांची डिसेंबर आणि जानेवारी मधील परीक्षा कोविड-१९ चा प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीकक्यू) स्वरुपात ५ जानेवारी पासून सुरु होणार आहेत.
विद्यापीठाने ५ नोव्हेंबरच्या पत्रान्वये वरील परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याबाबत महाविद्यालयांना कळविले होते. तसेच २८ डिसेंबर पासून काही अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतू, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. कुणाल पवार, फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे भुषण भदाणे यांच्यासह विधी शाखेचे विद्यार्थी निशांत शिपी, दीपक सोनवणे, प्रवीण खिरोळकर, दीपक शिरसाठ, शुभम तायडे यांनी सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घेण्यात यावी, अशी मागणी कुलगुरूंकडे केली होती. अखेर आता विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने ५ जानेवारी पासून सुरु होणार आहेत.
मॉक टेस्ट द्यावी लागणार
विद्यार्थ्यांना सॉफटवेअरच्या हाताळणी व सरावाकरीता सराव चाचणी अर्थात मॉक टेस्ट आयोजन करणे आवश्यक आहे. याकरीता २८ डिसेंबर पासून होणाऱ्या परीक्षा ५ जानेवारी पासून सुरु होतील. सुधारित वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येणार आहेत. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन केंद्राचे संचालक बी.पी.पाटील यांनी कळविले आहे.