उड्डाणपुलाच्या जागेवर खोदकाम केल्याने भुयारी गटार योजनेचे काम पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:07+5:302021-04-28T04:18:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. नकाशानुसार हे काम ‘टी’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. नकाशानुसार हे काम ‘टी’ आकारानुसार होणार आहे. मात्र सद्य:स्थितीत हे काम एल आकारात होत आहे. मात्र प्रस्तावित टी आकाराच्या पुलाच्या ठिकाणी भुयारी गटार योजनेंतर्गत खोदकाम झाल्याने, शिवाजीनगरातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी भुयारी गटार योजनेचे काम थांबवले आहे. भुयारी गटार योजनेचे काम या ठिकाणी झाले तर भविष्यात या ठिकाणी टी आकार पूर्ण होणार नाही, या भीतीने हे काम बंद करण्यात आले आहे. या वादावर आता पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठक घेऊन आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवाजीनगर उड्डाणपूल ‘टी’ आकाराचा मंजूर करण्यात आला आहे. स्थानिकांच्या विराेधानंतर पूर्वीप्रमाणेच काम सुरू आहे. परंतु नकाशानुसार ज्या ठिकाणी पुलाचे पिलर येणार आहेत. त्याच ठिकाणी भुयारी गटारीसाठी खाेदकाम केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी या ठिकाणी जाऊन भुयारी गटार योजनेसाठी सुरू असलेले खाेदकाम बंद पाडले. रेल्वे व राज्य शासनाच्या माध्यमातून शिवाजीनगरात जाण्यासाठी ‘टी’ आकाराच्या उड्डाणपुलाचा नकाशा मंजूर आहे. परंतु टाॅवरकडून सरळ शिवाजीनगरात पाेहोचणाऱ्या उड्डाणपुलाला स्थानिक रहिवाशांचा विराेध आहे. आंदोलनामुळे तत्कालीन पालकमंत्र्यांनी पुलाचे काम पूर्वीप्रमाणेच करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यानुसार उड्डाणपूल पूर्वीप्रमाणे ‘एल’ आकाराचे काम सुरू आहे. मात्र, ‘टी ’ आकाराच्या पुलाचे काम रद्द झालेले नाही. असे असतानाही टी आकाराचा पूल करताना ज्या ठिकाणी पुलाचे पिलर टाकण्यात येतील त्याच जागेत महापालिकेच्या अमृत याेजनेतून भुयारी गटारीसाठी खाेदकाम सुरू आहे. अमर चाैकापर्यंत खाेदकाम पाेहोचल्यानंतर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांना माहिती मिळाली.
अधिकाऱ्यांना बाेलावले जागेवर; बंद पाडले काम
शिवाजीनगरातील पुलाचे डिझाइन ‘टी’ आकाराचे मंजूर आहे. नकाशानुसार भविष्यात काम करावे लागणार आहे. डिझाइननुसार निधीदेखील मंजूर आहे. त्यामुळे ‘टी’ आकाराच्या पुलाचे काम रद्द झालेले नाही. असे असतानाही मनपाचा प्रकल्प विभागाने भुयारी गटारीसाठी परवानगी कशी दिली, असा सवाल दारकुंडे यांनी उपस्थित केला. प्रकल्प विभागाचे अभियंता याेगेश बाेराेले यांना जागेवर बाेलावले. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. मक्तेदारालादेखील हात वर करताे. मग जबाबदारी काेणाची, असा सवाल उपस्थित केला. तसेच भुयारी गटार योजनेचे काम सुचवल्याप्रमाणे हे काम सुरू असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. या उत्तरावर संतापलेले नगरसेवक दारकुंडे यांनी भुयारी गटार योजनेअंतर्गत सुरू असलेले खोदकाम बंद पाडले.
पालकमंत्री घेणार आढावा
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या संथ गतीबाबत जळगाव ग्रामीणमधील नागरिकांसह शहरातील नागरिकांकडूनदेखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या जात आहेत. तसेच हा पूल डिझाइननुसार होत नसल्यानेदेखील स्थानिक नागरिकांनी याबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मंगळवारी झालेल्या वादानंतरही काही नागरिकांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत तोडगा काढण्याची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या पुलाचा कामाचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासह शिवाजीनगर उड्डाणपुलाला अंतर्गत महावितरणचे खांब करण्याबाबतदेखील पालकमंत्री आढावा घेणार आहेत.
कोट
या पुलाचे काम सद्य:स्थितीत एल आकारात होत असले तरी टी आकाराच्या डिझाइनला अजूनही ना मंजुरी मिळालेली नाही. भविष्यात या ठिकाणी टी आकाराचा पूल होणार आहे. त्याच ठिकाणी जर भुयारी गटार योजनेचे काम झाले तर भविष्यात या ठिकाणी पूल होऊ शकत नाही. यामुळे यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
-नवनाथ दारकुंडे, नगरसेवक