महानुभाव सांकेतिक लिपी अभ्यास प्रकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:47 AM2018-09-30T01:47:44+5:302018-09-30T01:48:16+5:30
जळगाव येथील संशोधक, साहित्यिकप्रा.विनायक त्र्यंबक पाटील यांच्या ‘महानुभाव सांकेतिक लिप्यांचा अभ्यास’ या प्रकल्पास महाराष्टÑ राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाने मंजुरी दिली आहे. यातून महानुभाव लिपीची जिज्ञासू अभ्यासकांना ओळख होण्यास मदत होणार आहे.
महानुभावीय साहित्याचे अभ्यासक असलेले प्रा.विनायक पाटील सध्या ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत खान्देश आणि महानुभाव या सदरात लिखाण करीत आहेत. त्यांंनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रभादेवी मुंबई यांच्याकडे ‘महानुभाव सांकेतिक लिप्यांचा अभ्यास’ हा संशोधन प्रकल्प प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास साहित्य आणि संस्कृती मंडळाने मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पात प्रा.विनायक पाटील महानुभावांच्या ३०० वर्षे जुन्या तीन सांकेतिक लिप्यांची उकल करून पोथ्यांसह लिप्यंतर सादर करणार आहेत. सांकेतिक लिप्यांची नावे अशी आहेत. १) सांकेतिक शिर लिपी २) सांकेतिक कविश्वरी लिपी ३) सांकेतिक वज्र लिपी.
या प्रकल्पात एकूण ८०० पानांचे काम होणार आहे. मराठी संशोधन पत्रिका यांच्याद्वारा त्यांचे ‘सांकेतिक तळेगावकर लिपी’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. यापूर्वीही त्यांचे सुंदरा लिपी आणि पार मांडल्य लिपी असे दोन ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. दोन कवितासंग्रह आणि इतर असे एकूण सहा ग्रंथ त्यांच्या नावे आहेत.
-रवींद्र मोराणकर, जळगाव