अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:17 AM2021-09-21T04:17:51+5:302021-09-21T04:17:51+5:30
शहरासह तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आले असून या सततच्या पावसामुळे तालुका आता ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना ...
शहरासह तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आले असून या सततच्या पावसामुळे तालुका आता ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नागरिक तसेच व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड बसला असून धरणगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
भाजीपालादेखील कवडीमोल भावात विकला जात असून शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड बसत आहे. उडीद मूग, ज्वारी या सारख्या पिकांवर पाणी जास्त झाल्याने शेतातच त्यांना कोंब झाडावरच आले आहेत. धरणगाव तालुक्यात विक्रमी पावसाने कपाशीची लागवड जास्त असल्याने कपाशीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून येते. तालुक्यात ९० हजार हेक्टरी कपाशी लागवड करण्यात येत असून जास्त प्रमाणात हे पीक घेतले जाते. पावसाने हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.
काही शेतकऱ्यांनी विकास सोसायट्यांचे कर्ज घेऊन किंवा सावकारांचे कर्ज घेऊन लागवड केली. मात्र, हा पैसाही वाया गेला आहे. सोसायट्यांकडून घेण्यात आलेले कर्जही माफ केले जावे, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
---
वार्तापत्र कल्पेश महाजन