यावल व चोपडा तालुक्यात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:01 AM2020-07-17T00:01:28+5:302020-07-17T00:02:14+5:30
जुलै मध्यापर्यंत ३९ टक्के पाऊस
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाचे बुधवारी पुरागमन होताच यावल व चोपडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून गुुरुवारीदेखील जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. चोपडा तालुक्यात ७२.८५ मि.मी. तर यावल तालुक्यात ७२.३३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून बुधवारी चाळीसगाव तालुक्यात सर्वात कमी ६.७१ मि.मी. पाऊस झाला. दरम्यान, जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्याची पावसाची सरासरी ३९.४० टक्क्यांपर्यंत पोहचली असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणसाठ्यामध्येही वाढ होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने सर्वांची चिंता वाढली होती. मात्र आता दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या असून पिकेही बहरू लागली आहेत. बुधवारी जिल्हाभर सर्वत्र पाऊस होऊन आबादानी झाल्याचे चित्र आहे.
चोपडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी पाहता चोपडा तालुक्यात सर्वाधिक ४१४.३३ मि.मी. पाऊस झाला आहे. बुधवारीदेखील एकाच दिवसात चोपडा तालुक्यातच सर्वाधिक ७२.८५ मि.मी. पाऊस झाला. त्या खालोखाल यावल तालुक्यात ७२.३३ मि.मी. पाऊस होऊन दोन्ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. अशाच प्रकारे मुक्ताईनगर तालुक्यात ६१.५० मि.मी., बोदवड तालुक्यात ५१.३३ मि.मी., धरणगाव तालुक्यात ४५.८० मि.मी., भुसावळ - ४१.६० मि.मी., अमळनेर - ४०.३८ मि.मी., जळगाव - ३५.३३ मि.मी., एरंडोल - ३४.२५ मि.मी., रावेर - ३१.४२ मि.मी., जामनेर - ३०.१० मि.मी., पारोळा - २७.५० मि.मी., भडगाव - २० मि.मी., पाचोरा - १९.७१ मि.मी., चाळीसगाव - ६.७१ मि.मी. असा एकूण ५९१.०१ मि.मी. पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.
रात्रभर भीज पाऊस
बुधवार सकाळी दमदार पाऊस झाल्यानंतर रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला. हा पाऊस सकाळपर्यंत सुरूच होता. रात्रभर झालेल्या भीज पावसामुळे पिकांना फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत रिमझिम असणाºया पावसाने सकाळी १० वाजता पुन्हा जोर धरत सर्वत्र बरसला.
हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडे
हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी धरणाचे ३६ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारपर्यंत हे ३६ उघडे असताना त्यापैकी १२ दरवाजे दुपारी चार वाजता बंद करण्यात आले. २४ दरवाजे पूर्ण उघडे असून धरणातून २५ हजार ७८३ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.