वाळूच्या बेसुमार उपशाला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:57 PM2019-12-11T12:57:51+5:302019-12-11T12:58:20+5:30

कारवाई होत असतानाही धाक नाही, मंगळवारी पाच वाहने जप्त

Excessive sandy tissue of sand | वाळूच्या बेसुमार उपशाला ऊत

वाळूच्या बेसुमार उपशाला ऊत

Next

जळगाव : वाळू ठेके बंद होऊन उपशावर बंदी असतानाही शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच असून वाळू वाहतूकदारांकडून नदी पात्रातून उपशाला ऊत आला आहे. महसूलचे पथक नदीपात्राकडे जाऊन वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यावर वाळू वाहतूकदारांची नजर असते. त्यामुळे वाळूची वाहने पथकास चकमा देऊन पसार होत असल्याचेही प्रकार सुरू आहे. मुळात खरोखर पथकाकडून कारवाई केली जाते की केवळ सोपस्कार म्हणून पाहणी होत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ‘जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत वाळूचोरी’ या मथळ््याखाली मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशिक होताच महसूलच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे तीन ट्रँक्टर तर मुरुम वाहतूक करणारे दोन वाहने जप्त केली.
वाळू गटांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही वाळू गटातून वाळूचा उपसा करू शकत नाही. असे असले तरी दररोज मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याचे चित्र आहे. गिरणा नदीपात्रात तर वाळू उपशासाठी वाहनांची जत्राच भरल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे या ठिकाणी वाहनांच्या चाकांचे निशाण मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. त्यामुळे त्यावरूनच उपशाचा अंदाज येतो.
आव्हाणे, खेडी, वडनगरी, निमखेडी, सावखेडा, बांभोरी, नागझिरी या भागातून सर्रासपणे वाळू उपसा सुरु आहे. ही वाहतूक रात्रीच्या वेळी तर मोठ्या प्रमाणात होतेच सोबतच आता दिवसाही वाळूची वाहने वाळू भरुन नेत असल्याचे दिसून येते.
मंगळवारीदेखील गिरणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहने वाळू भरत होती. त्या ठिकाणी वाळू भरून-भरुन नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे.
नागझिरी परिसरात तीन ट्रॅक्टर जप्त
मंगळवारी ‘लोकमत’मध्ये ‘जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत वाळूचोरी’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशिक होताच महसूलच्या पथकाने कारवाई केली. यात नागझिरी परिसरात वाळू वाहतूक करणारे तीन ट्रँक्टर मंगळवारी सकाळी जप्त करून ती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आली. मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी सचिन माळी, रवींद्र वंजारी, सुधाकर पाटील यांनी ही कारवाई केली.
मुरुमचे दोन वाहने जप्त
मंगळवारी दुपारी पुन्हा महसूलच्या पथकाने औद्योगिक वसाहत परिसरात मुरुम वाहतूक करणार एक ट्रॅक्टर व एक डंपर असे दोन वाहने जप्त करून ती जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात लावण्यात आली. मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी सचिन माळी, रवींद्र वंजारी, सुधाकर पाटील यांच्यासह प्रांत कार्यालयातील जगदीश धमाले, पो.कॉ. हितेश महाजन यांनी ही कारवाई केली.

Web Title: Excessive sandy tissue of sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव