जळगावात दिवाळीच्या खरेदीसाठी उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:51 PM2018-11-07T12:51:32+5:302018-11-07T12:51:59+5:30
पूजेच्या साहित्यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी उसळली गर्दी
जळगाव : लक्ष्मीपूजन, चैतन्यमय प्रकाशपर्वाचा बुधवारी महत्त्वपूर्ण दिवस. यासाठी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी जळगाव शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. सुवर्ण बाजारही सलग दुसऱ्या दिवशी फुलला होता.
गेल्या आठवड्यापासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. मंगळवारी महात्मा गांधी रोड, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट या परिसरात कपड्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी तरुणाईसह पुरुष, महिला, लहान मुलांची गर्दी झालेली होती.
चोपडी पूजनासाठी खरेदी
व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. यामुळे यासाठी चोपडीदेखील (वह्यांची) मंगळवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. लहान आकारापासून मोठ्या आकारातील वह्या, रजिस्टर यांची खरेदी करण्यात आली. २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या वह्यांना मागणी होती.
चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले असून दिवाळीला १५०च्यावर चारचाकी वाहनांची विक्री अपेक्षित असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. एकाच दालनात १००चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. दुचाकींनादेखील मागणी वाढली असून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ५०० दुचाकी विक्री होण्याची अपेक्षा आहे.
पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबग
बाजारपेठेत थाटलेल्या पूजा साहित्याच्या प्रत्येक दुकानावर गर्दी झालेली होती. केरसुणी, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या-बत्तासे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. लक्ष्मीच्या मूर्ती ६० रुपये ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. या सोबतच लक्ष्मीपूजनात अनन्य महत्त्व असलेल्या केरसुणी २० रुपये ४० रुपये प्रति नग विक्री होत आहे. लहान आकाराच्या केरसुणी १५ रुपयांपासून उपलब्ध आहे. या सोबतच लाह्या ६० रुपये किलो तर बत्तासे १०० ते १२० रुपये किलोने विक्री होत आहे.
सुवर्णबाजारात दुसºया दिवशीही गर्दी
जळगावातील सुवर्णबाजारात सोने खरेदीसाठी मंगळवारी सलग दुसºया दिवशी गर्दी कायम होती. धनत्रयोदशीला सोमवारी मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी झाल्यानंतर मंगळवारीदेखील सुवर्णपेढ्या गजबजून गेल्या होत्या.
झेंडुच्या फुलांना मागणी
दिवाळीसाठी शहरात मंगळवारी सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेसह ठिकठिकाणी झेंडुच्या फुलांची दुकाने लागली होती. ३० ते ५० रुपये प्रती किलोने झेंडुच्या फुलांची विक्री होत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात फुलांची आवक असल्याचे भाव नियंत्रणात असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.
सोने खरेदीसाठी मंगळवारीदेखील गर्दी होती. सुट्या असल्याने बाहेरगावाहून जळगावात आलेले मंडळीदेखील सहकुटुंब सुवर्ण खरेदीसाठी आल्याने मोठी गर्दी झाली होती.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन
धनत्रयोदशीला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आजही सोने खरेदीस चांगली मागणी राहिली. सकाळपासूनच सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी झाली होती.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
चारचाकी वाहनांच्या खरेदीस चांगला प्रतिसाद असून दिवाळीसाठी आमच्या एकाच दालनात ४७ वाहनांची डिलिव्हरी दिली जाणार आहे.
- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
लक्ष्मी पूजन हे अश्विन अमावस्येलाच होते. त्यामुळे अमावस्येच्या पर्वकाळात महालक्ष्मीपूजन कुलपरंपरेनुसार करण्यात येते. त्यासाठी विशिष्ठ मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. अमावस्या हाच पर्वकाल आहे, असे जाणकारांचे म्त असून लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूतार्ची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
आज सकाळी - ६.२७ ते ७.५३ शुभ, ८.२७ ते १०.४१ वृश्चिक लग्न
सकाळी - ६.३८ ते ८.२ पर्यंत लाभ, ८.२ ते ९.२६ पर्यंत अमृत, १०.५१ ते १२.१५ पर्यंत शुभ, दुपारी १.३१ ते ३.६ पर्यंत कुंभलग्न, ३.६ ते ४.२५ चल, दुपारी ४.२५ ते संध्याकाळी ५.५२ लाभ.
वृषभ लग्न व गोरज मुहूर्त - सायंकाळी ६ ते ८.२०, सायंकाळी ७.२८ ते रात्री ९.४, शुभ, रात्री ९.४ ते १०.३९ अमृत, मध्यरात्रीनंतर सिंहलग्न.