जळगावात कापड खरेदीसाठी उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:56 AM2017-09-24T11:56:47+5:302017-09-24T11:58:34+5:30
बाजार गजबजला : घागरा, कुर्ती, पायजमाला वाढली मागणी
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - सण उत्सावाचे पर्व सुरू होताच कापड बाजाराने उसळी घेतली असून विविध प्रकारचे कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होवू लागली आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या पाश्र्वभूमीवर घागरा, कुर्ती पायजामा अशा प्रकारच्या कपडय़ांना मोठी मागणी आहे. या सोबतच साडय़ा खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे तर तरुणाईकडून जीन्स, टी शर्ट यांना जास्त मागणी असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. दोन दिवसांपासून तर खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गुरुवारी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीची स्थापना, पूजा-अर्चा झाल्यानंतर शुक्रवारपासून शहरवासीय खरेदीसाठी बाहेर पडले. शहरातील बहुतांश दुकानांमध्ये कापड खरेदीसाठी गर्दी झाल्याने अनेक ग्राहक दुकानांमध्ये प्रतीक्षा करीत थांबले होते.
सणउत्सवांचे दिवस असल्याने कापड दुकानांमध्ये नावीण्यपूर्ण वस्त्रांचा स्टॉक प्रमाणात उपलब्ध करून दिलेला आहे. यामुळे ग्राहकांना कपडे निवडीस मोठा वाव आहे. दुकान मालकांनी रेडिमेड मेन्सवेअर वस्त्रश्रृंखला, सुटिंग्ज अॅण्ड शटिर्ंग तसेच साडय़ा व ड्रेसमटेरियल्स नवीन स्टॉकमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. नवरात्रोत्सवात ग्राहक अधिकाधिक खरेदीचा लाभ घेताना बाजारपेठेत दिसून येत आहे.
सध्या कपडय़ांमध्ये घागरा, कुर्ती, पायजामा यांना नवरात्र उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर पसंती आहे. या सोबतच टी-शर्ट, जीन्स, ज्ॉकेट यांना मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले. नवनवीन साडय़ा उपलब्ध झाल्याने त्यांच्या खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी वाढली आहे. विविध प्रकारच्या कपडय़ांना पसंती असून ग्राहकांच्या आवडीनुसार कपडे उपलब्ध करून दिलेले आहे.
-विजय गोविंदाणी, कापड व्यावसायिक, एस-3 सुरेश शुटिंग्ज अॅण्ड सारीज्.