उत्साह, प्रत्येक ठिकाणी वेगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 04:54 PM2019-11-19T16:54:55+5:302019-11-19T16:55:56+5:30
खरंच कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर जाताना बायकांचा जो उत्साह असतो तो खरंच बघण्यासारखा आणि दखल घेण्यासारखाही असतो. अगदी पंधरा ते वीस मिनिटांच्या कामासाठी किंवा कार्यक्रमालासुद्धा बरोबर कोण येईल, काय घालायचे, कुठे भेटायचे, कसं जायचं यावर अर्धा तास फोनवर बोलण्यापासून ते तयारीला एक तास लागला तरी त्यांना चालते आणि अगदी एखाद्या लग्नाला जाताना तयारीचा जो उत्साह असतो तसाच तो जाणवतो. या उत्साहाविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत साहित्यप्रेमी कौस्तुभ परांजपे...
आजही असेच फोन वर बोलणे सुरू होते व जाण्याची तयारी आणि वेळ ठरवणे सुरू होते. या उत्साहाकडे मी कौतुकाने बघत होतो.
अगं येणार आहेस ना? हं तेच म्हणत होते मी. कुठे आहे? अगं म्हणजे एकाच ठिकाणी आहे. बरं मग किती वाजता निघायचं. हो बरोबर आहे. लवकरच जाऊन येऊ. अगं मग उन्हाचं नकोसं वाटतं. रांगेतही उभं रहावं लागतं. त्यापेक्षा आपण लवकरच जाऊन येऊ. दोघेही बरोबरच येणार आहात नं. हो आम्हीपण.
नाही गं अजून तयारी व्हायची आहे. बरं एक ना. काय म्हणतेय मी; ड्रेस घालणार आहेस का साडी नेसणार आहेस? कोणत्या रंगाची? बरं बरं मी मी अबोली रंगाची काढते आज. हो गं बऱ्याच दिवसांपासून नेसलेच नाहीये आणि दोघींची सारखी पण होणार नाही आणि हो त्यावर फोटो पण चांगला येतो.
खरं तर रंग या विषयावर चित्रकारांपेक्षाही बायकांचीच चर्चा अधिक झाली असेल, असं वाटतं. बरं रंग कोणी तयार केले किंवा त्यांची नाव कोणी ठेवली यापेक्षाही रंगावर मनापासून आणि प्रेमाने बोलणाºया बायकांना अबोली हे नाव खरंच मनापासून आवडल असेल का? कारण नाव अबोली आणि त्यावर आपणच भरभरून बोलायचं म्हणजे? पण ठिक आहे, काय करणार, चालायचंच. पण अबोली हे नाव छानच आहे.
कदाचित रंगालासुद्धा बोलता आले असते तर अबोली या रंगाने ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ हे काय असतं ते सांगितलं असतं. कारण नाव अबोली पण त्यावर चर्चा मात्र भरमसाठ आणि उत्साहाने... घरातून निघातानाही अगोदर तयारी झाल्याचा व निघत असल्याचा व तेथे भेटण्याचा फोन झालाच आणि मग मला सूचना, त्या टेबलवर घडाळ्याखाली नीट ठेवलेल्या आहेत. बरोबरच घ्या, तिथे परत फिराफीर करावी लागते. सगळं बरोबर आहे व बरोबर घेतलं आहे याची खात्री झाल्यावर आम्ही बाहेर पडलो व ठरलेल्या ठिकाणी काही मिनिटे एकमेकांची वाट पाहून भेटलो. सगळं फोनवर बोलणं झाल्यावरदेखील या बायकांचा तिथेही बोलण्याचा उत्साह चार पाच वर्षांनी भेटलेल्या सारखा तर आम्हा पुरुषांच मात्र हाय हॅलो झाल्यावर निघायचं का? यावर चर्चा. तिथे गेल्यावर दहावीच्या परीक्षेत पहिल्या पेपरच्यावेळी मुलांना शाळेत गेल्यावर वर्ग कुठे आहे ही पाहण्याची, सांगण्याची व दाखवण्याची जेवढी उत्सुकता असते तेवढीच इथेही जाणवली. त्यानंतर आमचं नांव, नंबर पाहून आम्ही व्यवस्थित आमचा हक्क बजावून बाहेर आल्यावर परत यांचा उत्साहाचा पुढील भाग सुरू. बरं बाहेर आल्यावरसुद्धा बोर्डाच्या परीक्षेत पेपर खूपच सोप्पा गेल्यावर जो आनंद विद्यार्थ्यांच्या चेहºयावर असतो, तसाच यांच्याही चेहºयावर होता.
एका झाडाखाली आपल्या कपड्यांचे रंग त्या मागच्या भागावर उठावदार दिसतील अशा पद्धतीने उभे राहिल्यावर आपली शाई लावलेली बोटं दिसतील पण आपला हसरा चेहरासुद्धा तेवढाच चांगला दिसेल या पद्धतीने चांगले दोन तीन फोटो काढून ते एकमेकांना दाखवून नंतर पुढे पाठवून ते फोटो व्यवस्थित पाठवले गेले आहेत याची खात्री झाल्यावरच आमच मतदानाचं कर्तव्य पार पाडल यावर शिक्कामोर्तब झाल्यावर आम्ही घराच्या दिशेने निघालो. आता घरी गेल्यावर परत फोनवर कोण कोण जाऊन आलं किंवा जाणार आहे याची विचारपूस होईलच, पण आताचा कार्यक्रम तरी सध्या पुरता संपला आहे हे नक्की.
-कौस्तुभ परांजपे, जळगाव