दिवाळीच्या खरेदीसाठी उत्साह, सुवर्ण बाजार गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:19 PM2019-10-27T12:19:21+5:302019-10-27T12:20:43+5:30
पूजेच्या साहित्यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी उसळली गर्दी
जळगाव : लक्ष्मीपूजन, चैतन्यमय प्रकाशपर्वाचा रविवारी महत्त्वपूर्ण दिवस. यासाठी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी जळगाव शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. सुवर्ण बाजारही सलग दुसऱ्या दिवशी फुलला होता.
गेल्या आठवड्यापासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. शनिवारी महात्मा गांधी रोड, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट या परिसरात कपड्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी तरुणाईसह पुरुष, महिला, लहान मुलांची गर्दी झालेली होती.
चोपडी पूजनासाठी खरेदी
व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. यामुळे यासाठी चोपडीदेखील (वह्यांची) शनिवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. लहान आकारापासून मोठ्या आकारातील वह्या, रजिस्टर यांची खरेदी करण्यात आली. २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या वह्यांना मागणी होती.
चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले असून दिवाळीला ४००च्यावर चारचाकी वाहनांची विक्री अपेक्षित असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. एकाच दालनात २७५ चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. दुचाकींनादेखील मागणी वाढली असून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ६०० दुचाकी विक्री होण्याची अपेक्षा आहे.
पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबग
बाजारपेठेत थाटलेल्या पूजा साहित्याच्या प्रत्येक दुकानावर गर्दी झालेली होती. केरसुणी, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या-बत्तासे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. लक्ष्मीच्या मूर्ती १०० रुपये ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. या सोबतच लक्ष्मीपूजनात अनन्य महत्त्व असलेल्या केरसुणी २० रुपये ४० रुपये प्रति नग विक्री होत आहे. लहान आकाराच्या केरसुणी १५ रुपयांपासून उपलब्ध आहे. या सोबतच लाह्या ६० रुपये किलो तर बत्तासे १०० ते १२० रुपये किलोने विक्री होत आहे.
सुवर्णबाजारात दुसºया दिवशीही गर्दी
जळगावातील सुवर्णबाजारात सोने खरेदीसाठी शनिवारी सलग दुसºया दिवशी गर्दी कायम होती. धनत्रयोदशीला शुक्रवारी मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी झाल्यानंतर शनिवारीदेखील सुवर्णपेढ्या गजबजून गेल्या होत्या.
झेंडुच्या फुलांना मागणी
दिवाळीसाठी शहरात शनिवारी सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेसह ठिकठिकाणी झेंडुच्या फुलांची दुकाने लागली होती. २० ते ५० रुपये प्रती किलोने झेंडुच्या फुलांची विक्री होत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात फुलांची आवक असल्याने व पावसाचाही फुलांवर परिणाम होत असल्याने त्यांचे भाव चांगलेच गडगडले आहे.
कपडे खरेदीसाठी मोठी गर्दी
नवीन कपडे खरेदी केले जातात. सध्या कपड्यांची दुकाने विविधरंगी आणि स्पेशल दीपावलीसाठी आलेल्या कपड्यांनी सजली आहेत. लहान मुलांच्या कपड्यांमध्येही विविध व्हरायटीज् उपलब्ध आहेत. त्यातही सुती कपड्यांना जास्त मागणी आहे. कापड घेऊन शिवणकाम करण्यात वेळ जास्त जात असल्याने, शिवाय त्यामध्ये त्रुटी राहण्याच्या भीतीने आजही तयार कपडे घेण्याकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. त्यामुळे रेडिमेड कपड्यांमध्ये विशेष गर्दी दिसत आहे. अनारकली, लेगीज टॉप, पतियाला अशा कपड्यांचा ट्रेण्ड अजूनही आहे. या कपड्यांमध्ये काही नवीन लुक दाखल झाले आहेत. ‘मेन्सवेअर’मध्येही अनेक प्रकार बाजारपेठेत उपलब्ध असून कंपन्यांनीही दीपावलीसाठी आॅफर्स जाहीर केल्याने कंपन्यांचे ड्रेस घेण्याकडे पुरुष ग्राहकांचा कल वाढला आहे.
अनेक आॅफर्स
दीपावलीनिमित्त एकावर एक मोफत, एक हजार रुपयांच्या किंमतीवर सूट, त्याचप्रमाणे बदलत्या युगाप्रमाणे क्रेडिट, डेबिट कार्डने खरेदी केल्यास १०ते १५ टक्के कॅशबॅकची सुविधाही ग्राहकांना जाहीर करण्यात आली आहे.
फराळाचे स्टॉल
प्रत्येक दीपावलीला दहा दिवस अगोदरच तयार फराळ तसेच फराळ तयार करून देण्याचे स्टॉल ठिकठिकाणी उभारले जातात. मात्र यंदा निवडणूक मतदानानंतर स्टॉल उभारण्यात आले असून सध्या या स्टॉल्सवर फराळ बनवण्याची लगीनघाई सुरु आहे. रात्रीचा दिवस करून फराळ बनवला जात आहे.