Exclusive : उमेदवारीबाबत आपला अनुभव चांगला नाही, नाथाभाऊंची 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 12:32 PM2020-03-07T12:32:48+5:302020-03-07T12:43:21+5:30
भाजपाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमुख नेत्यांचे तिकीट कापले. त्यामध्ये, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचाही समावेश होता.
विजयकुमार सैतवाल
जळगाव/मुंबई - राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाकडूनएकनाथ खडसे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत बोलताना एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा जुनीच नाराजी दर्शवली. विधानसभेतच आपल्याला रस होता, असेही त्यांनी लोकमतशी बोलून दाखवले. दरम्यान, राज्यसभेसाठी भाजपाकडून एकनाथ खडसेंची उमेदवारी निश्चित झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे.
भाजपाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमुख नेत्यांचे तिकीट कापले. त्यामध्ये, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचाही समावेश होता. आपली उमेदवारी कापल्यानंतर एकनाथ खडसेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे विधानसभेसाठी त्यांनी आपला अर्जही दाखल केला होता. मात्र, भाजपाने त्यांचे काहीच ऐकले नाही. ऐनवेळी, नाथाभाऊंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंना यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, या निवडणुकीत रोहिणी खडसेंचा पराभव झाला. त्यामुळे, एकनाथ खडसे पुन्हा नाराज झाले होते.
गोपीनाथ गडावरील आपल्या भाषणात उघडपणे एकनाथ खडसेंनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. तसेच, पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा जाणीवपूर्वक पराभव करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळेच, उमेदवारीबाबत आपला अनुभव चांगला नसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. ''उमेदवारीबाबत आपला अनुभव चांगला नाही. विधानसभेत रुची होती, तेव्हा उमेदवारी दिली नाही, आता राज्यसभेची उमेदवारी देऊन उपयोग नाही. होईल तेव्हा पाहू, ते काही खरे नाही, असे स्पष्ट मत एकनाथ खडसेंनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होत असून महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या जागांवरील सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, माजिद मेमन निवृत्त होत आहेत. त्यामुळे, मेमन यांच्याऐवजी फौजिया खान यांना संधी देण्याचे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने निश्चित केल्याचे समजते. तर, राज्यातील भाजप नेतृत्वाने उदयनराजे भोसलेंना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे. तसेच, नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनाही राज्यसभेत पाठविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यासोबतच, रामदास आठवलेंची खासदारकी कायम ठेवण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.