खळबळजनक : मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे जिलेटीनचा स्फोट घडवून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:03 PM2019-06-07T12:03:47+5:302019-06-07T12:27:53+5:30
स्फोटाने गाव हादरले
मुक्ताईनगर, जि. जळगाव : तालुक्यातील चारठाणा येथे आकाश राजू वरखेडे (वय २२) या युवकाच्या खाटेखाली जिलेटीनचा स्फोट घडवून त्याचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना ६ जूनच्या मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. आकाश हा आपल्या अंगणात खाटेवर झोपलेला असताना एका अज्ञात व्यक्तीने जिलेटीनची कांडी त्याच्या खाटेखाली लावून स्पार्किंग करत स्फोर्ट घडवून आणला. त्यात आकाश हा जागीच ठार झाला. या स्फोटमुळे संपूर्ण गावात हादरा बसला व गावकऱ्यांनी स्फोट झाल्याच्या ठिकाणी धाव घेतली. मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. यात एका व्यक्तीच्या घरात जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्याने त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. संबंधितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. गावात पोलिसांचा ताफा असून घटनास्थळी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मयत आकाश वरखेडे यास मुक्ताईनगर जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले असून गावात शांतता आहे.