गणेशोत्सवादरम्यान अवैध धंदेचालकांना हद्दपार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 06:34 PM2018-09-11T18:34:49+5:302018-09-11T18:35:45+5:30
फैजपूर येथे शांतता समितीच्या बैठकीत अपर पोलीस अधीक्षकांचे आदेश
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश उत्सवादरम्यान तसेच विसर्जन मिरवणुकीत डिजे वाजवू नये. वाजविल्यास कायदेशीर कार्यवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी फैजपूर येथे शांतता समितीच्या बैठकप्रसंगी केले.
या वेळी त्यांनी माझ्याजवळ संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंदेचालकांची व मालकांची यादी असून या सर्वांना गणेश उत्सवादरम्यान हद्द पार करावे अशा कडक सूचना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या व गणेश उत्सव शांततेत आनंदोत्सव साजरे करण्याचे आवाहन केले.
व्यासपीठावर फैजपूर डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , माजी नगराध्यक्ष बी के चौधरी, न्हावीचे माजी उपसरपंच नितीन चौधरी, वेल्फर पाटीर्चे प्रदेश अध्यक्ष रुउफ जनाफ, इकबाल शेख खान, पीएसआय आधार निकुंभे, होमगार्ड समदेशक विक्की कोल्हे उपस्थित होते.
या वेळी प्रास्ताविक सपोनि दत्तात्रय निकम यांनी करून शहर व परिसरातील गणेश उत्सवासंदर्भात माहिती दिली. बी.के.चौधरी, नितीन चौधरी , रुउफ जनाफ, केतन किरंगे, अशोक भालेराव यांनी मनोगत व्यक्त करून गणेश उत्सव व मोहरम उत्साहात व आनंदात साजरे करण्याचे आश्वासन दिले.
सूत्रसंचालन निर्मल चतूर यांनी, तर आभार डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांनी मानले. या वेळी भाजपा शहराध्यक्ष संजय रल, काँग्रेस शहराध्यक्ष कौसर अली, माजी नगरसेवक शेख जफर, शेख रियाज, रामराव मोरे, बी.डी.तायडे यांच्यासह शहर व परीसारतील गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.