चोपड्यात निघाली पाच हजार आजी-माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली दीड किलोमिटरची शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:50 PM2018-01-05T17:50:19+5:302018-01-05T18:00:45+5:30
प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दी महोत्सवाच्या शोभायात्रेत नेत्रदिपक चित्ररथ ठरला आकर्षण
आॅनलाईन लोकमत
चोपडा, दि.५ - चोपडा शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवारी शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील मिसाईलच्या प्रतिकृतीसह जीवंत देखावे, शिस्तबद्ध विद्यार्थी संचलनाने नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सुमारे दीड किलोमिटर लांबीच्या या शोभायात्रेत पाच हजार आजी-माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रारंभी प्रताप विद्या मंदिराच्या प्रागंणात ध्वजारोहण चोपडे शिक्षण मंडळाचे चेअरमन राजा मयूर यांच्या हस्ते झाले. संस्थेचे उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, सेक्रेटरी माधुरी मयूर, संचालक चंद्रहास गुजराथी, उर्मिला गुजराथी, नगराध्यक्षा मनिषा चौधरी, प्रफुल्ल गुजराथी, रमेशलाल जैन, प्रवीण गोपालदास गुजराथी, प्रविणकुमार सप्तर्षी, आर.बी.गुजराथी, गिरिष मयूर, नगरसेवक जीवन चौधरी, भुपेंद्र गुजराथी, शैला मयूर उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याध्यापिका अरुणा पाटील यांनी केले.
त्यानंतर अश्वारूढ विद्याथीर्नी, शंभर कलशधारी नववारी साडीतील विद्याथीर्नी, प्रशालेचा संपूर्ण शंभर वर्षांच्या प्रगतीचा इतिहास सांगणारे चित्ररथ, शंभरचा आकडा तयार करणारे प्रतिकृतीतील तीन मिसाईल, तसेच चोपडे शिक्षण मंडळातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बी.एड., डी.एल.एड, इंग्लीश मेडीयम, कृषी, एन.सी.सी., आर.एस.पी., स्काऊट गाईड या विभागाच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत विविध आकर्षक व विविध संदेश देणारे सजीव देखावे ठेऊन चित्ररथ तयार केले होते. आदिवासी नृत्यानी देखील शोभायात्रेत शोभा आणली.
शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
प्रताप विद्या मंदिर, स्वस्तिक टॉकिज, श्रीकृष्ण मंदिर, मोतिनिवास, गुजराथी गल्ली, डॉ.हेडगेवार चौक, गोलमंदिर, बाजारपेठ, बोहरा गल्ली, आझाद चौक, डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक या मार्गाने सुमारे दीड कि.मि.लांबीची शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेचे स्वागत शहरभर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करुन करण्यात आले. गुजराथी वाडीजवळ ओटा परिवाराने व आझाद चौकात मुस्लीम जनतेने केलेले स्वागत लक्ष्यवेधी होते. ठिकठिकाणी जोरदार फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.