मसाकाच्या अस्तित्वासाठी ‘साखर पेरणी’चा त्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 07:12 PM2017-09-10T19:12:00+5:302017-09-10T19:17:02+5:30
सभासदांचा सुखद धक्का : सर्वसाधारण सभा 45 मिनिटात आटोपली
लोकमत न्यूज नेटवर्क
फैजपूर : मधुकर सहकारी साखर कारखान्याची 43 वी वार्षिक सभा रविवारी कारखाना कार्यस्थळावर अवघ्या 45 मिनिटात आटोपली. सभासदांनी साखर नको तर कारखान्याचे अस्तित्व टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगत विषय पत्रिकेवरील सात विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली. माजी चेअरमन तथा आमदार हरिभाऊ जावळे यांनी बहिष्कार अस्त्र वापरत अनुपस्थित राहिले.
सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते. प्रास्ताविकात चेअरमन महाजन यांनी मधुकरची वाटचाल सध्या प्रतिकुल परिस्थितीतून होत असल्याचे सांगितले. मागील वर्षी (1.86,735 मे.टन) ऊसाचे गाळप कमी झाले. त्यात रिकव्हरी सुद्धा (9.30 टक्के) कमी मिळाली त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या. यावर्षी तीन लाखार्पयत गाळप होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संचीत तोटय़ात ही 50 कोटीर्पयत वाढ झाल्याचे नमूद केले. मुल्ये रुपये उणे 3455.45 लाख इतके असल्याचे सांगितले. सभासदांच्या साखर वाटपाचा प्रश्न जिव्हाळय़ाचा आहे. मात्र आर्थिक व तांत्रिक अडचणीमुळे साखर वाटप करू शकत नाही. महाराष्ट्रातील बहुतांश कारखाने आहे. परिस्थिती सुधारल्यावर त्यावर निश्चित विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त करीत संचालक मंडळ चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक मंडळावर तुम्ही अडचणीच्या काळात विश्वास दाखवून ‘साखरेचे नंतर बघू आधी कारखाना जगू द्या’ या भूमिकेचे कौतुक केले व तसा ठरावच बहुमताने करण्यात आला. विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक महेश सगरे यांनी केले. तर मागील वर्षाच्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सचिव राजेंद्र तळेले यांनी केले. विषय पालिकेवरील कारखान्याच्या हितसंबंधीचे सर्व सात विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. सभेला माजी खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, अरुण पाटील, उल्हास चौधरी, जिल्हा बँक माजी व्हा.चेअरमन राजीव पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, जिल्हा दुध संघाचे संचालक हेमराज चौधरी, नगराध्यक्षा महानंदा होले, यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी, माजी नगराध्यक्षा अमिता चौधरी, भगतसिंग पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष मुन्ना पाटील, केतन किरंगे, कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक व सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी तर आभार व्हा.चेअरमन भागवतराव पाटील यांनी मानले.