Lok Sabha Election 2019 : प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या खर्चाची जुळवा-जुळव सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:18 PM2019-04-21T12:18:48+5:302019-04-21T12:19:35+5:30
निवडणूक खर्च निरीक्षकांकडून तपशीलाची तपासणी
जळगाव : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवडणूक खर्च निरीक्षकांनी शनिवारी मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या हिशोब नोंदवह्या तपासल्या. यात निरीक्षण नोंद वही व उमेदवारांकडील नोंदवही यांच्यात या पूर्वीही तफावत आल्याने त्यांची बारकाईने तपासणी सुरू असून प्रमुख राजकीय पक्षांच्या खर्चाची जुळवा-जुळव सुरूच असल्याची माहिती मिळाली. यात रविवारीदेखील आकडेमोड सुरूच राहणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनमध्ये शनिवारी सकाळपासून जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक वेणूधर गोडेसी आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक मधुकर आनंद यांच्या उपस्थितीत दोन्ही मतदार संघात निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांच्या खर्चाच्या हिशोब नोंदवहीची (शॅडो रजिस्टर) तिसरी तपासणी सुरु करण्यात आली.
यावेळी निवडणूक खर्च नियंत्रण व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित, खर्च निरिक्षकांचे संपर्क अधिकारी तुषार चिनावलकर, डी. बी. बेहरे, विनोद चावरीया, लेखाधिकारी देशमुख, पी. पी. महाजन, पी. पी. सोनवणे, विलास पाटील, कपिल पवार यांच्यासह निवडणूक खर्च शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी निवडणूक खर्च निरीक्षकांनी मतदारसंघहनिहाय उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून आतापर्यंतच्या खर्चाच्या हिशोब नोंदवह्या, बँकेचे पासबुक, रोखीने करण्यात आलेला दैनंदिन आर्थिक व्यवहार, खर्चाचा ताळमेळ करताना दाखविण्यात आलेली बिले, इत्यादींची तपासणी केली. त्याचबरोबर निवडणूक खर्च शाखेकडे सादर केलेल्या बिलांचा ताळमेळ, जाहिरात प्रमाणीकरण समितीने सादर केलेले खर्चाचे विवरण उमेदवारांनी त्यांच्या खर्चात दाखविले किंवा नाही याचीही पडताळणी केली. ‘पेडन्यूज’बाबतचीही माहिती जाणून घेतली.
मागील दोन तपासणीच्यावेळी ज्या उमेदवारांच्या हिशोब नोंदवहीमध्ये तफावत आढळून आली, त्यांना देण्यात आलेल्या नोटीसीवर त्याचा खुलासा इत्यादींची तपासणी करण्यात आली.
निवडणुकीनंतर निवडणूक लढविणाºया उमेदवारांच्या अंतिम खर्चाची तपासणी करण्यात येणार असून त्याबाबत संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल, असे केंद्रीय निरीक्षकांनी यावेळी सांगितले.