अनुभव गुरूप्रमाणे मार्गदर्शक ठरतात : खासदार रक्षा खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 01:03 AM2020-09-05T01:03:04+5:302020-09-05T01:05:11+5:30
शालेय शिक्षण घेताना वृत्तपत्र वाचनाची सवय होती. वाचनातून अलगद महाराष्ट्रातील समाजकार्य व सामाजिक चळवळ या विषयावर मैत्रिणीसोबत चर्चा व्हायची.
मतीन शेख
मुक्ताईनगर : शालेय शिक्षण घेताना वृत्तपत्र वाचनाची सवय होती. वाचनातून अलगद महाराष्ट्रातील समाजकार्य व सामाजिक चळवळ या विषयावर मैत्रिणीसोबत चर्चा व्हायची. सामाजिक कार्य हा विषय आवडता बनला. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर शिक्षकांचे परिस्थितीनुरूप मार्गदर्शन मिळाले. पारिवारिक पार्श्वभूमीवर सामाजिक कार्य करण्यास राजकारणाचे माध्यम पूरक असल्याचे गुरुजनांनी दिलेल्या मार्गदर्शनातून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत खासदारकीपर्यंतचा प्रवास गाठला आहे, असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
शनिवारी शिक्षक दिन साजरा केला जाणा आहे. या पार्श्वभूमीवर त्या आपल्या भावना व्यक्त करीत होत्या.
जीवनात शिस्तीचा पाया
प्रवरा पब्लिक स्कूल येथे माध्यमिक शिक्षण घेताना नागरिकशास्त्र विषयाचे शिक्षक आर.जी.वरकड यांनी मोलाचे शिक्षण दिले. जीवनात शिस्तीचा पाया रचला. नागरिकत्वाच्या सैद्धांतिक, राजकीय आणि व्यावहारिक बाबींचा याशिवाय नागरिकांच्या हक्क आणि कर्तव्यांचा शिक्षण देताना समाज कार्य या माझ्या आवडीला प्रोत्साहन दिले. ती शिकवण आणि प्रोत्साहन सामाजिक जबाबदारी पार पाडताना जीवनात कामी येत आहे.
गुरूंनी दिला आत्मविश्वास
पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुटुंबात रमले. परंतु समाजकार्याची आवड स्वस्थ बसू देईना. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगची स्पर्धा परीक्षा द्यावी. अधिकारी बनून सामाजिक देणे याबाबतची जबाबदारी पूर्ण करावी, अशी इच्छा होती. त्यासाठी जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनमध्ये क्लासही लावला. येथे मार्गदर्शक यजुर्वेंद्र महाजन यांनीदेखील माझ्या सामाजिक कार्यातील आवडीला प्रोत्साहन दिले. कुटुंबाची पार्श्वभूमी राजकीय असल्याने जे कार्य स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी रूपाने करायचे आहे, ते राजकारणाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे करता येईल हा आत्मविश्वास त्यांनी दिला. येथूनच समाजकारणासाठी सक्रिय राजकारणाकडे वळले.
अनुभव गुरूप्रमाणे मोलाची ठरतात
कधी कधी आयुष्यात येणारे संकटे ही स्वत:ला खंबीर बनवतात. संकटांशी सामना करीत मिळणारी शिकवण मिळालेले अनुभव गुरूप्रमाणे मोलाची ठरतात. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता ही जीवनाला दिशा देते. स्वत:ला आत्मनिर्भरता बनवते.
बाबा राजकीय मार्गदर्शक
माझ्या राजकीय प्रवासात बाबा अर्थात माजी मंत्री एकनाथराव खडसे हे चालते बोलते विद्यापीठ त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी राजकीय निर्णय क्षमतेला बळ देणारे. राजकारण करताना ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या माझ्या भूमिकेला त्यांच्या मार्गदर्शनाची मोलाची साथ लाभली. त्यातून समाजाच्या तळागाळातील लहान घटकांपर्यंत न्याय देण्यासाठी माझे कार्य अविरत सुरू आहे.