बांगला देशातील लाँचमधील अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:38 PM2019-04-06T14:38:35+5:302019-04-06T14:39:29+5:30

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिल शहा यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. त्यांच्या प्रवास वर्णनावर आधारित लेखमालेचा तिसरा भाग...

Experience in the launch of Bangladesh | बांगला देशातील लाँचमधील अनुभव

बांगला देशातील लाँचमधील अनुभव

googlenewsNext

मूळ योजनेनुसार ढाक्क्याहूून निघून दुसऱ्या दिवशी थेट रंगबलीला दुपारी एक वाजता पोहोचणे आणि त्या रात्री लॉन्चमधेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी निघून रात्री ढाक्क्यात परतणे अशी होती. पण ढाक्क्यातल्या लोकांनी थेट रंगबलीऐवजी बरिसालचे बुकींग करून तुकड्या तुकड्याच्या प्रवासाने का होईना, पण लवकर पोहोचू आणि आपला एक दिवस वाचेल असा खुलासा दिला.
आधी सदरघाट ते थेट रंगबली प्रवासाची ईमेलने आणि इंटरनेटवर माहिती घेतली होती. त्यात अगदीच कशीतरी म्हणजे जेमतेम सहा फूट बाय पाच फूट आणि एकदम कमी उंचीची केबिन दिसली होती. ती पाहून मी प्रवास कसा होईल याच्या फारच चिंतेत होतो. खूप काही नकारात्मक विचार करतो आणि समोर त्यामानाने थोडी जरी चांगली गोष्ट आली तरी आपल्याला आनंद होतो.
आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी माझी स्थिती झाली. येथे प्रत्यक्षात माझ्यासमोर साधारण १० बाय १० फुटांची केबिन. त्यात एक छान लाकडी पलंग, एक सोफा. भिंतीवर मोठे घड्याळ, एसी आणि पंखाही होता. स्वच्छ अंथरूण पांघरूण, कोपºयात कपडे टांगायच्या उभ्या स्टॅण्डवर टॉवेल आणि नमाज पढायला एक छोटा गालीचा घडी करून ठेवलेले होते. रूमबाहेर चार बाय चारची छोटी गॅलरी, त्यात एक खुर्ची, त्याच्याच बाजूला साधारण पाच बाय पाचचे अतिशय स्वच्छ न्हाणी घर. त्यात साबण आणि कमोडही. सर्वत्र भरपूर एलइडी लाईट्स. छत, जमीन, भिंती, फर्निचर सर्वच लाकडी. त्या सर्वांना छान चकचकीत पॉलिश.
अशा एकूण सहा केबिन एकमेकासमोर दोन रांगांमध्ये होत्या. त्या दोन रांगांमध्ये साधारण १० बाय ३० फुटांच्या मोकळ्या जागेत चार सोफा व एक सहा खुर्च्यांचे जेवणाचे टेबल. फ्रीज, बेसिन, छोटा किचन ओटा, ओव्हन, मिक्सर, प्यायच्या पाण्याचा जार. क्रॉकरीसाठी छोटे कपाट.
माझ्या आयुष्यात अशा प्रकारचा प्रवास प्रथमच करीत होतो. पुढील प्रवासात अनेक आश्चर्ये होती, त्याची मला कोणतीही कल्पना या क्षणी नव्हती.
लॉन्च सुटली तेव्हा कुतुहलापोटी केबिन बाहेरच्या डेकवर येऊन गम्मत बघत होतो. किनारा हळूहळू दूर चालला होता. बुरीगंगाचे विस्तीर्ण पात्र दिसत होते. तिच्या काळ्या दिसणाºया पाण्यात किनाºयावरच्या रंगीबेरंगी जाहिराती आणि इतर दिव्यांचे प्रतिबिंब पडले होते. कोणत्यातरी मोठ्या उंच इमारतीवर मोठा एलएडी स्क्रीन झळकत होता. त्यात पंतप्रधान शेख हसीना काहीतरी बोलत असल्याची चित्रफित वारंवार दाखवली जात असल्याचे दिसत होते.
डेकवरून बुरीगंगाच्या पाण्यात एक नवीच गोष्ट पाहिली. वेळेत न आल्याने ज्यांची लॉन्च सुटली होती, ती गाठण्यासाठी नामी शक्कल लोकांनी लढवली होती. छोट्या-छोट्या बोटीतून फर्राट वेगाने लॉन्च गाठून तिच्या काठावरच्या पडदीसारख्या भागावर उतरायचे आणि लॉन्चच्या आत यायचे. सुटलेली लॉन्च गाठायची सोय आणि छोट्या बोटीवाल्यांचेही पोट भरायची सोय. शिवाजी महाराजांनी छोट्या गुराबा अशाच वेगाने पळवत सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाकावर टिच्चून सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग यांची कामे करून घेतली होती. तेव्हा काय झाले असेल त्याची ही झलक पाहायला मिळाली.
डेकवरून आत आलो. तेव्हा केबिन विभागात खानसामा होता. तो मेनू घेऊन आला, रात्री काय जेवाल विचारायला. काय काय मिळू शकते असे विचारता त्याने जे काही सांगितले. त्यावरून एकूणच शाकाहारी माणसांची मोठी पंचाइतच व्हावी. एक जात सगळे मांसाहारी पदार्थ.
पण ‘दाल-भात’ होता. शिवाय बटाटे भेंडी इ.ची ‘मिक्श व्हेज’ भाजी. ‘खिचरी’ होती. हे पाहताच मला आनंद झाला. विचारले ‘खिचरी’ देणार का? उत्तर होते, कमीत कमी १० प्लेटची आॅर्डर द्यावी लागेल!. आम्ही होतोच सगळे मिळून चार आणि त्यातला मी एकटाच शाकाहारी. बाकीच्यांना मांस (म्हणजे मासे) आणि इतर काहीही चालणार होते. (क्रमश:)
-सी.ए.अनिलकुमार शहा

Web Title: Experience in the launch of Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.