महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यादेशापूर्वीच भूमीपूजनाची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:57 PM2019-07-17T12:57:48+5:302019-07-17T12:58:17+5:30
१९ रोजी भूमीपूजन
जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.५३च्या (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६) च्या शहरातील ८ किमी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे कार्यादेश संबंधित कंपनीला देणे बाकी असतानाही १९ जुलै रोजी या कामाचे भूमीपूजन केले जाणार आहे. कंपनीशी केवळ करार झालेला असताना अपघातांमुळे व शहरातील रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे नागरिकांमध्ये सध्या निर्माण झालेला रोष शमविण्यासाठी भूमीपूजनाची घाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या भूमीपूजनासाठी आमदार सुरेश भोळे हे आग्रही असल्याचेही सांगितले जात आहे.
शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा मिळाल्यानंतर गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम हे देण्याचे निश्चित करण्यात आले.
केवळ करार
निविदा निश्चित झाल्यानंतर जेसीसी या कंपनीशी केवळ करार झाला आहे. मात्र कंपनीला अद्याप कार्यादेश दिलेले नाही, अशी माहिती ‘नही’च्या अधिकाºयांकडून मिळाली. या कामाचे अद्याप कार्यादेशच दिलेले नसल्याचेही सांगण्यात आले.
भूमीपूजनासाठी घाई
शहरातून जाणाºया या महामार्गावर दररोज अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या महामार्गासह समांतर रस्त्यासाठी वेगवेगळे आंदोलन झाले. प्रशासनावर अनेकांनी रोषही व्यक्त केला. त्यानंतर या कामांचा कित्येक दिवस डीपीआर तयार झाला नाही, तो झाला तरी निविदांमध्ये बदल झाले. गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे घोळ असताना तसेच शहरवासीयांची नाराजी असताना एवढी तत्परता कधीही दाखविली गेली नाही. आता कार्यादेश नसताना भूमीपूजनासाठी घाई का केली जात आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
१९ रोजी पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमीपूजन
या घाईमध्ये महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमीपूजनाचा मुहूर्तही ठरविण्यात आला असून १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. याला ‘नही’च्या अधिकाºयांसह खुद्द आमदार सुरेश भोळे यांनीही दुजोरा दिला आहे.
रोष शमविण्याचा प्रयत्न
चार दिवसांपूर्वी चित्रा चौकात रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन उद्योजक अनिल बोरोले यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर दुसºयाच दिवशी महामार्गाच्या खराब साईडपट्ट्यांमुळे पुन्हा अपघात झाला व उज्ज्वल सोनवणे हा तरुण ठार झाला. खराब रस्त्यामुळे हे बळी गेले असल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरवासीयांमध्ये प्रचंड रोष आहे. सोबतच अमृत योजनेमुळे रस्त्यांची मोठी दूरवस्था होण्यासह जागोजागी असलेले खड्डे व पावसामुळे होणारा चिखल हेदेखील विषय दोन अपघातांनंतर ऐरणीवर आले आहेत. या संदर्भात सोशल मीडियावरही वेगवेगळ््या चर्चा होऊन याबाबत मोठा संताप व्यक्त केला जात आहे. शहरवासीयांचा हा वाढता रोष शमविण्यासाठी महामार्ग चौपदरीकरण कामाच्या भूमीपूजनाची घाई केली जात असल्याचा आरोप होत आहे.