आॅनलाइन तिकीटांचा काळाबाजार उघड
By admin | Published: February 17, 2017 10:37 PM2017-02-17T22:37:56+5:302017-02-17T22:38:08+5:30
आॅनलाइन तिकीटांचे बुकींग करून त्यांची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या शहरातील आरपीडी रोडवरील स्टार सिटी आॅनलाईन सर्व्हिसेसच्या मो. हुसेन शेर मोहम्मद (वय २८, भुसावळ) यास अटक करण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि.17 - आॅनलाइन तिकीटांचे बुकींग करून त्यांची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या शहरातील आरपीडी रोडवरील स्टार सिटी आॅनलाईन सर्व्हिसेसच्या मो. हुसेन शेर मोहम्मद (वय २८, भुसावळ) यास अटक करण्यात आली. आरोपीकडून सुमारे २५ हजारांची आरक्षित तिकीटे जप्त करण्यात आली.
मुंबईच्या मुख्य सतर्कता पथकाने (व्हिजिलन्स) स्थानिक आरपीएफ व आरपीएफ गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली़ या कारवाईने तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईचे मुख्य सतर्कता निरीक्षक अतुल धीरसागर यांना प्राप्त झालेल्या तक्रारी व गुप्त माहितीनंतर शुक्रवारी रात्री सापळा रचण्यात आला़ आरपीएफ निरीक्षक व्हीक़े़लांजीवार, आरपीएफ गुन्हे शोध शाखेचे अतुल टोके यांच्या मदतीने आरोपीच्या आरपीडी रोडवरील स्टार सिटी आॅनलाईन सर्विसेसवर धाड टाकून संगणक व मुंबई, उत्तर प्रदेशासह बिहारातील विविध ठिकाणांची स्लीपर व वातानुकूलित डब्यातील सुमारे २५ हजारांची १५ तिकीटे जप्त करण्यात आली़ आरोपी आपल्याच नावाने तिकीटे बुक करून त्याची तिकीटाच्या डबल भावाने विक्री करीत असल्याची तक्रार पथकाला होती. रेल्वे कायदा कलम १४३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
एका मिनिटात रिझर्वेशन
सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी संगणकात विशिष्ट सॉप्टवेअर वापरून आॅनलाईने तिकीटे बुक करायचा त्यामुळे एका मिनिटात त्याला आरक्षित तिकीट उपलब्ध व्हायचे़ विविध गाड्यांना नेहमीच असणाऱ्या हाऊसफुल्ल रिझर्वेशनमुळे पथकाने लक्ष केंद्रीत करून कारवाई केली.
आयपी अॅड्रेस ट्रेस
व्हिजिलन्सने आरोपीच्या संगणकाचा आयपी अॅड्रेस तज्ज्ञांकडून ट्रेस करीत भुसावळ गाठत आरोपीला अटक केली़ संगणक हा महत्त्वाचा पुरावा ठरणार असून त्यातून अनेक गुपिते बाहेर पडणार आहेत़ केवळ भुसावळच नव्हे ठिकठिकाणी आॅनलाईन तिकीटांची काळाबाजारी करणारे व्हिजिलन्सच्या रडारवर असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.