नैसर्गिक वायू व तेल शोधासाठी उत्खनन
By admin | Published: March 18, 2017 12:28 AM2017-03-18T00:28:48+5:302017-03-18T00:28:48+5:30
पथराड परिसर गजबजला : शोधकार्यासाठी ताफा तळ ठोकून
पथराड, ता.धरणगाव : पथराडसह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळातर्फे नैसर्गिक वायू आणि तेलाच्या शोधासाठी उपग्रहाशी जोडलेल्या दूरसंवेदक प्रणालीद्वारे सव्र्हे करून ड्रिलिंग (उत्खनन) केले जात आहे. या संशोधनासाठी तीन दिवसांपासून बहुसंख्य विविध प्रकारची वाहने आणि अधिकारी, कर्मचारी व मजुरांचा ताफा तळ ठोकून आहे, त्यामुळे हा परिसर गजबजून गेला आहे.
केंद्र सरकारकडून तेल आणि वायूचा शोध घेण्यासाठी सध्या महाराष्ट्रात सव्र्हे केला जात आहे. त्यातील एक मोठे पथक पथराड परिसरात मुक्कामी आले असून यामध्ये इंडोनेशियातील अधिकारी मोहंमद कमाला शफी यांचाही समावेश आहे. उपग्रहाशी जोडलेल्या दूरसंवेदक प्रणालीद्वारे ठिकठिकाणी सव्र्हे करून दर एक किलोमीटर अंतरावर जमिनीत ड्रिलिंग केले जात आहे. जमिनीत ड्रिलिंग (बोअरिंग) करणारे सुमारे वीसच्या वर ट्रॅॅक्टर व विविध यंत्रणा यासाठी वापरली जात आहे. संशोधक ताफ्यातील बहुतेक अधिकारी, कर्मचारी आंध्र प्रदेशातील असून मजूर बिहारकडील आहेत. शुक्रवारी पथराड परिसरात अनेक ठिकाणी ड्रिलिंग करून हे पथक पुढे पुढे सरकत चावलखेडा परिसराकडे जात असल्याचे सांगण्यात आले.
धरणगाव तालुक्यात नैसर्गिक वायू आणि तेलाच्या शोधासाठी केंद्र सरकारच्या ओएनजीसीचे पथक आले आहे. हे पथक पथराडसह चावलखेडा, अनोरे आदी ठिकाणीही परवानगीनुसार जाणार आहे.
-कैलास कडलग, तहसीलदार