‘रिअॅक्टर’वर दाब निर्माण झाल्याने जळगावातील गीतांजली केमिकल्समध्ये झाला स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 06:15 PM2018-01-08T18:15:49+5:302018-01-08T18:35:08+5:30
गीतांजली केमिकल्समधील स्फोटातील ८ पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.८ : फिनॉल, एच-२ ओ-२ व पाणी यांचे मिश्रण तयार होऊन रिअॅक्टरवर दाब निर्माण झाल्यामुळेच गीतांजली केमिकल्स या कंपनीत स्फोट झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. या घटनेमुळे नाशिक विभागाचे सहायक कामगार उपायुक्त, एमआयडीसीचे अधिकारी व पोलिसांनी सकाळी कंपनीची पाहणी करुन पंचनामा केला. पोलिसांनी कंपनीतून ज्वालाग्रही पदार्थांचे नमुने घेतले असून ते मुंबईतील सांताक्रूज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
औद्योगिक वसाहतमधील गीतांजली केमिकल्स या कंपनीत रविवारी रात्री ९.१५ वाजता स्फोट झाला. त्यात ८ कामगार भाजले गेले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या कंपनीत दोन महिन्यातील ही दुसरी मोठी घटना आहे. सोमवारी सकाळी नाशिक विभागाचे सहायक कामगार उपायुक्त गुलाब दाभाडे, एमआयडीसीचे एरिया मॅनेजर महेंद्र पटेल व त्यांच्या पथकाने कंपनीत भेट देऊन पाहणी केली. कंपनीतील प्रशासकीय अधिकारी परेश झंवर व अन्य तज्ज्ञांनी या अधिकाºयांना माहिती दिली.
कामगारांचे नोंदविले जबाब
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी सकाळीच भेट देत घटनास्थळाचा पंचनामा करण्यासह कामगार व परिसरातील कंपनी चालकांचे त्यांनी जबाब नोंदवून घेतले. यावेळी स्फोटाचे कारण शोधण्यासाठी एच.सी.आय, एच-२ ओ-२, आर.के.-१५ व एच.बी.आर आदी ज्वालाग्रही पदार्थांचे नमुने घेऊन ते सीलबंद करुन प्रयोगशाळेत पाठविले.
रात्री २७ कामगार होते ड्युटीला
या कंपनीत १२० कामगार कंत्राटी पध्दतीने तर ३० कामगार प्रशासकीय कामासाठी व ४० कामगार कायम असे १९० कामगार आहेत. त्यापैकी रविवारी दुपार सत्रात २७ कामगार ड्युटीला होते. स्फोट होताच सर्वत्र पळापळ झाली. त्यात आठ कामगार जखमी झाले आहेत.
शेजारी ई-२२ मध्ये सतीश दशरथ ओसवाल यांच्या मालकीची ए.एस.इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. या स्फोटातील काही अवशेष या कंपनीत उडाले होते. त्यामुळे दोन पत्रे तुटली आहेत. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सुदैवाने रात्री या ठिकाणी कोणी कामगार नव्हते.
कंपनीचे मालक मुंबईत
पवनकुमार गिरधारीलाल देवरा हे कंपनीचे मालक असून सुरेंद्रकुमार रवीकुमार मोहता व मधू सुरेंद्र कुमार मोहता हे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतात. मोहता व देवरा यांची या कंपनीत भागीदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कंपनी मालकासह सहा जणांविरुध्द गुन्हा
कामगारांच्या सुरक्षेविषयी कोणत्याही प्रकारची सुरक्षात्मक उपाययोजना न करता व काळजी न घेता कामगारांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरले म्हणून कंपनी मालक सुरेंद्र कुमार मोहता, मधू सुरेंद्र मोहता, पवनकुमार देवरा, व्यवस्थापक जितेंद्र यशवंत पाटील, डी.डी.इंगळे व श्रीकांत काबरा यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला भादंवि कलम २८५,२८७, ३३७,३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे स्वत: फिर्यादी झाले आहेत.
...तर स्फोट घडला नसता
कंपनीतील कॅटलवर रसायन गरम व मिश्रण होण्यासाठी मीटर लावलेले असते. या मीटरवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञ राहिला असता तर हा स्फोट झाला नसता, व्यवस्थापनाच्या चुकीमुळेच हा स्फोट झाल्याचा जबाब यातील गंभीर जखमी झालेल्या अनिल उत्तम शिरसाळे (वय ३५, रा.शिवाजी नगर, जळगाव) यांनी पोलिसांकडे दिला आहे. कॅटलमध्ये केमिकलचे कमी जास्त मिश्रण व जास्त चाजींग झाल्याने आर.के.१५ या रिअॅक्टरमध्ये जास्त दाब निर्माण झाला म्हणूनच हा स्फोट झाल्याचेही जबाबात म्हटले आहे.