मोरया कंपनीत स्फोट! मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख मदत; वारसांना नोकरी देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 06:34 AM2024-04-20T06:34:07+5:302024-04-20T06:34:29+5:30
एमआयडीसीतील मोरया कंपनीत स्फोट झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव : एमआयडीसीतील मोरया कंपनीत स्फोट झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वच जखमींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने जिल्हा प्रशासनाने कंपनीच्या प्रशासनाशी गुरुवारी रात्री चर्चा केली. त्यानंतर कंपनी प्रशासनाने मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत तर जखमींचा उपचाराचा खर्च करण्याची तयारी दाखविली आहे.
तसे पत्रच कंपनीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दिले.
कंपनीतील स्फोटानंतर मालक अरुण निंबाळकर व व्यवस्थापक नोमेश रायगडे यांना अटक करण्यात आली आहे. तशातच भाजलेल्या कामगारांना उपचारासाठी आर्थिक भार उचलावा लागत आहे. ही बाब ध्यानात आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कंपनी प्रशासनाने जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका घेतली.
असा आहे प्रस्ताव
- मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख मदतीच्या स्वरुपात देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच एका वारसाला नोकरीवर घेतले जाईल. उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनी प्रशासन करेल.
- प्रस्तावानुसार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार यांना मयत कामगारांची माहिती, बँक खात्यांचे विवरण, वारसदारासह अन्य प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
कंपनीच्या प्रस्तावानुसार ही मदत उपलब्ध झाल्यास पीडित कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर शासन पातळीवर पाठपुरावा करण्याची प्रशासनाची भूमिका राहणार आहे. - सोपान कासार, निवासी उपजिल्हाधिकारी.