बाहेरील पथकाकडून बनावट दारुचा पर्दाफाश; स्थानिक यंत्रणा करतेय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:55+5:302021-07-21T04:12:55+5:30
जळगाव : बनावट दारुची निर्मिती असो कि तस्करी याचा नाशिक व पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात ...
जळगाव : बनावट दारुची निर्मिती असो कि तस्करी याचा नाशिक व पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात येऊन पर्दाफाश केला. या पथकाने एकाच आठवड्यात सलग दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. पाचशे ते अडीचशे किलोमीटर अंतरावरुन येऊन बाहेरील पथक जळगाव जिल्ह्यात कारवाया करीत असताना स्थानिक यंत्रणा करतेय तरी काय?, त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांनी ११ जुलै रोजी चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर बोढरे फाट्याजवळ ८४ लाख रुपये किमतीची बनावट दारु पकडली. त्याच्या दोन दिवसानंतर पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या पथकाने भुसावळात बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त करुन ११ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. एकाच आठवड्यात सलग मोठ्या कारवाया होईपर्यंत त्या-त्या तालुक्यांचे निरीक्षक असो किंवा अधीक्षक यांना थांगपत्ताही नव्हता. या कारवायांमुळे स्थानिक यंत्रणेची कमालीची नाचक्की झालेली आहे. नाशिकला विभागीय उपायुक्त असलेले ओेहोळ हे एकेकाळी जळगावला अधीक्षक होते तर पुण्याचे उपायुक्त देखील दोन वर्षापूर्वी नाशिक विभागीय उपायुक्त होते, त्यामुळे त्यांचाही जळगावशी संपर्क आहेच. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जळगावात कारवाया केल्या आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांकडे खबऱ्यांचे नेटवर्क नाही की? आणखी काही प्रकार आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.
बनावट दारु, ताडीची जिल्ह्यात चलती
जळगाव जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशाची सीमा असल्याने या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारुची निर्मिती होते. विशेष म्हणजे उच्च दर्जाच्या ब्रँडच्या नावाने पॅकींग करुन बनावट दारुची विक्री केली जाते. तत्कालीन अधीक्षक सुधीर आढाव यांच्या काळात बनावट दारु निर्मितीचे अनेक कारखाने उद्ध्वस्त झाले होते. त्यांच्या बदलीनंतर अशा कारवायाच झाल्या नाहीत. नाशिक येथून बदलून आलेल्या चंद्रकांत पाटील या निरीक्षकांनी आल्या-आल्या मन्यारखेडा शिवारात बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही देखील तीन वर्षापूर्वी ५६ लाखाची बनावट दारु पकडली होती. दरम्यान, बनावट ताडीची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होते. वडली, ता.जळगाव येथे एका तरुणाचा ताडीमुळे मृत्यू झाल्याची घटना तीन महिन्यापूर्वी घडली होती.
खुलासा व नोटीसबाबत उपायुक्तांनी बोलणं टाळले
बाहेरील पथकाकडून जिल्ह्यात कारवाया झाल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पुण्याच्या पथकाने कारवाई केल्याची माहिती मिळाली. एक कारवाई आपण स्वत: केली होती. एका जिल्ह्यातील यंत्रणा दुसऱ्या जिल्ह्यात जावून कारवाई करीत असले तरी सामूहिक कारवाई आहे. स्थानिक यंत्रणेकडून खुलासा किंवा नोटीस याबाबत त्यांनी बोलणं टाळले.