संगीतात भावस्पर्शी व्यक्तिमत्त्व : प्रा.नारायणराव पटवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:44 PM2019-04-06T14:44:15+5:302019-04-06T14:44:43+5:30

नांदेड येथील संगीततज्ज्ञ अण्णासाहेब गुंजकर यांचे शिष्य प्रा.नारायणराव पटवारी यांचा उल्लेख एक सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व, असा करता येईल. प्रा.पटवारी यांचे गेल्या पंधरवड्यात जळगावात निधन झाले. त्यांच्या कन्या डॉ.संगीता म्हसकर यांनी वडिलांच्या कार्याविषयी घेतलेला आढावा.

Expressed personality: Prof. Narayanrao Patwari | संगीतात भावस्पर्शी व्यक्तिमत्त्व : प्रा.नारायणराव पटवारी

संगीतात भावस्पर्शी व्यक्तिमत्त्व : प्रा.नारायणराव पटवारी

Next

संगीतात प्रावीण्य प्राप्त केलेल्या नारायणरावांचे तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या तीन विषयांवरदेखील प्रभुत्व होते. नारायण पटवारींचा जन्म नांदेड जिल्ह्यातील एका खेड्यात १९३७ साली झाला. घरात संगीताची फारशी पार्श्वभूमी नसतानादेखील त्यांच्या मनात मात्र संगीताविषयी ओढ निर्माण झाली आणि त्यांना अण्णासाहेब गुंजकरांसारखे गुरू लाभले. नारायणराव पटवारी यांनी हैद्राबाद विद्यापीठातून तत्वज्ञान विषयात एम.ए.ची पदवी घेतली आणि १९६४ मध्ये ते भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र या दोन्ही विषयांचादेखील त्यांंनी विलक्षण अभ्यास केलेला असल्यामुळे या विषयांवरही त्यांचे प्रभुत्व होते. या तीनही विषयांवर त्यांची व्याख्याने रंगत. भुसावळच्या सांगितीक क्षेत्रातदेखील लवकरच प्रा.पटवारी यांंनी आपल्या असाधारण कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
संगीताचा प्रसार
प्रा.पटवारी यांनी भुसावळात सांगितिक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व प्र्रकारचे प्रयत्न केले. भुसावळात सर्वप्रथम त्यांनी ‘म्युझिक सर्कल’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे प्रत्येक महिन्यात संगीत मैफिलीचे आयोजन होत असे. प्रा.पटवारी यांचे सर्वात महत्वपूर्ण असे एक कार्य म्हणजे त्यांनी ‘म्युुझिक सर्कल’तर्फे १९८०, १९८५, १९९० आणि १९९६ यावर्षी भव्य स्वरुपात खान्देश संगीत महोत्सव घडवून आणले. या महोत्सवात कंकणा बॅनर्जी, भीमसेन जोशी, परवीन सुलताना, प्रभा अत्रे, हलीम जाफर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांना आमंत्रित केले होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या महोत्सवाला रसिकांना विनामुल्य प्रवेश देण्यात आला होता. या महोत्सवात बाहेरील कलावंतासोबत खान्देशातील प्रथितयश कलावंतांनीही आपली कला सादर केली होती. रसिकांचा भरभरू न प्रतिसाद या महोत्सवांना लाभला.
संगीत विषयाचा समावेश
नाहाटा महाविद्यालयात प्रा.पटवारी यांनी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती केली. यात सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कक्षेत येत होती. पुणे विद्यापीठात त्यावेळेस संगीत विषयाचा समावेश नव्हता. महाविद्यालयीन पातळीवर शिकवण्याचा हा विषय आहे अथवा नाही याविषयीची चर्चा या ठिकाणी अभिप्रेत नव्हती. परंतु यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की, खान्देशसारख्या भागात त्याकाळी संगीत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. त्यामुळे या भागात महाविद्यालयीन पातळीवर संगीताचा समावेश होणे महत्वाचे होते. प्रा.पटवारी यांनी विलक्षण मेहनत घेऊन नाहाटा महाविद्यालयात १९८२ च्या सुमारास संगीत विभागाची सुरूवात केली आणि पुणे विद्यापीठात संगीत सुरू करण्याचा प्रथम मान नाहाटा महाविद्यालयाने त्या काळात प्राप्त केला. त्यानंतर खान्देशातील इतर महाविद्यालयातूनदेखील संगीत विभाग सुरू झाले. पण त्यासाठी बराच कालावधी जावा लागला.
मैफिली
प्रा.पटवारी यांच्या अनेक ठिकाणी मैफिली होत असत. खान्देशात आणि बाहेरही औरंगाबाद, खंडवा, झाशी, परभणी, नांदेड, अकोला, खामगाव, काठमांडू इत्यादी अनेक ठिकाणी त्यांच्या मैफिली झाल्या आहेत. गायनाबरोबरच संवादिनीवरही त्यांचे प्रभूत्व आहे.
शैक्षणिक क्षेत्र
शैक्षणिक क्षेत्रात प्रा.पटवारी यांनी विविध प्रकारचे कार्य केले. तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र या विषयात पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांचे ते सदस्य होते. अभ्यासक्रम समिती, परीक्षा समिती यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. तत्त्वज्ञान विषयात डॉ.सुरेंद्र बारलिंगे त्यांचे गुरू होते. निवृत्तीनंतरही तर्कशास्त्र या विषयाचे अध्यापन ते करत. संगीताचे अध्यापनही जळगावात ते करत. थोडक्यात, भुसावळात सांगितिक वातावरण निर्माण करण्यात मौलिक योगदान देणारे नारायणराव पटवारी विविधांगी व्यक्तिमत्वाचे कलावंत होते.
-डॉ.संगीता म्हसकर, जळगाव

Web Title: Expressed personality: Prof. Narayanrao Patwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.