मालमत्ताकराच्या रकमेच्या दहा टक्के सवलतीला मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:21 AM2021-04-30T04:21:22+5:302021-04-30T04:21:22+5:30
जळगाव : महानगरपालिकेकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता करात १० टक्के सूट दिली जाते. गेल्या चार दिवसांपासून ऑनलाइन पद्धतीने भरणा ...
जळगाव : महानगरपालिकेकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता करात १० टक्के सूट दिली जाते. गेल्या चार दिवसांपासून ऑनलाइन पद्धतीने भरणा स्वीकारला जात आहे. नागरिकांकडून भरणा जास्तीत जास्त व्हावा यासाठी सूट मिळण्याची मुदत मेअखेरपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी केली आहे. मालमत्ता करात १० टक्के सूट मिळत असल्याने एप्रिल महिन्यात भरणा करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. परंतु यंदा ही सुविधा उशिराने सुरू झाली आहे. सध्या शहरात लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे थेट महापालिकेच्या प्रभाग समितीत जाऊन भरणा करता येत नसल्याने नागरिकांची अडचण आहे, अशा परिस्थितीत नागरिक १० टक्के सूटपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सूट मिळण्याची मुदत ३० एप्रिल असल्याने त्यात वाढ करून मेअखेरपर्यंत १० टक्के सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोनामुळे मृत झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या
जळगाव : कोरोनामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तसेच यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकटदेखील निर्माण झाले असून, शासनाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत कोरोनामुळे मृत झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पालकमंत्री व कृषिमंत्र्यांना निवेदनदेखील देण्यात आले आहे.
‘शावैम’मधील उपचारपद्धती चांगली : महापौर जयश्री महाजन
अधिष्ठाता डॉ. रामानंद व शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांची घेतली भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना दिली जाणारी उपचारपद्धती खूप चांगली आहे. येथील कोविडबाधित रुग्णांसाठी व्यवस्थापन उत्तम दिसत असल्याचे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांनी कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद व शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांची भेट घेतली. प्रसंगी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापन कसे चालते याची माहिती घेतली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून वॉर्डांची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी रुग्ण प्रवेशप्रक्रिया, त्यांना दिली जाणारी वैद्यकीय व रुग्णालयीन सेवा, भोजन सेवेची माहिती दिली. भोजन कक्षासाठी आहारतज्ज्ञांचा समावेश असलेली समिती कार्यरत आहे. जीएमसीच्या उत्तम सेवेमुळे गरीब लोकांना आर्थिक झळ बसत नाही. केवळ अत्यवस्थ व गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल असतात, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास मालकर उपस्थित होते.