..अमृत पाणीपुरवठा योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:08+5:302021-06-10T04:12:08+5:30
जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ ...
जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका अशा सूचनादेखील आता राज्य शासनाने दिले आहे. पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून आतापर्यंत ही तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीपर्यंत जळगावकरांना अमृतचे पाणी मिळण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून शहरात पाणीपुरवठा याेजनेचे काम हाती घेण्यात घेण्यात आले आहे. मार्च २०१७ मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर २०१९ पर्यंत या योजनेचे काम होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदार, मनपा प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हे काम लांबतच गेले. तीन वेळा मुदतवाढीनंतरही याेजनेचे काम पूर्ण हाेऊ शकलेले नाही. राज्य शासनाने काम पूर्णत्वासाठी मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली हाेती. मात्र, काेराेना काळामुळे कामाला उशीर झाल्याने राज्य शासनाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील पत्र महापालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यात राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सहा ते नऊ महिने मुदतवाढ देण्याची सूचना केली आहे. जळगाव महापालिकेसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ निश्चित केली आहे. याेजनेचे काम तातडीने पूर्ण करावे. कामात काेणत्याही कारणांमुळे व्यत्यय येऊ नये, असेही म्हटले आहे.
जलवाहिनीचे काम पूर्ण, नळ संयोजनाचे कामाला सुरुवात
अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. यामध्ये जलवाहिनीचे काम आतापर्यंत ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर पाण्याच्या टाक्यांचे काम देखील ७० टक्के पूर्ण झाले असून, आता पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जळगावकरांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी योजनाच्या कामाला ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली आहे. जलवाहिनींना जाेडणीसाठी आवश्यक असलेले डीआय पाईपांचा पुरवठा न झाल्याने काम रखडले आहे. दरम्यान, मुंबई येथील बैठकीत डीआय पाईपांचा मजीप्रने पुरवठा करावा असे आदेश दिले आहेत. शहरातील निमखेडी व अयाेध्या नगरातील जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर सुप्रीम काॅलनी, मेहरूण, गेंदालाल मिलमधील जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. नित्यानंद नगरसह अन्य जलकुंभाचे काँक्रीटचे काम सुरू आहे.
वॉटर मीटरचा प्रश्न मात्र प्रलंबितच
अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करताना वॉटर मीटर आवश्यकताच राहणार आहेत. मात्र याबाबत अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. एका खासगी कंपनीकडून हे काम करून घेण्यात येणार होते. यासाठी मनपाच्या अंदाजपत्रकात देखील ९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.