दूध उत्पादकांना ५ रूपये अनुदानाला मुदतवाढ - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:53 PM2018-10-30T12:53:51+5:302018-10-30T12:54:11+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आढावा बैठक
जळगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लीटरमागे ५ रूपये अनुदान देण्याची मुदत आॅक्टोबर अखेर संपत होती. मात्र दुष्काळी परिस्थिती असल्याने आमदार सुरेश भोळे यांनी ही मुदत वाढविण्याची मागणी केल्याने ही मुदत आणखी तीन महिने वाढवित असल्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ आढावा बैठकीत केली.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतावर जाऊन पाहणी करण्यासाठी आलेल्या पशुसंवर्धन मंत्री जानकर यांना आमदार भोळे यांनी आढावा बैठकीतच निवेदन दिले. त्यात शासनाकडून सहकारी संघ व खाजगी संघांना लिक्वीड मिल्क सेल वगळून ज्या अतिरिक्त गाईच्या दुधाचे दूध भुकटीत रूपांतर केले जाते, अशा दूधाला ५ रूपये प्रतिलिटर अनुदान दिले जाते. मात्र संघाने उत्पादकाला त्यांनी खरेदी केलेल्या संपूर्ण दुधावर रूपये २५ प्रतिलिटर भाव देणे बंधनकारक आहे. ही योजना आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत कार्यरत होती.
जळगाव जिल्हा दूध संघाकडे ८०० पेक्षा अधिक प्राथमिक दूध उत्पादक संस्था, बचतगट यांच्याकडून प्रति दिन २ लाख लीटर गाईच्या दुधाचे संकलन होते. त्यापैकी १.२० लाख लिटर्स दुधाची तरल विक्री होते. तर ८० हजार लिटर्स दुधासाठी पावडर केली जाते.
दूध संघाने १०० टक्के दुधाचे पेमेंट बँकेद्वारा दूध उत्पादकांना अदा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संघाने प्राथमिक दूध उत्पादक संस्थांना बँकेद्वारे पेमेंट केले असल्याने शासनाने पूर्ण अनुदान संघास अदा करावे, अशी मागणी केली. तसेच योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली. ती मागणी जानकर यांनी मान्य करीत योजनेस आणखी तीन महिने मुदतवाढ दिली.
पाईपलाईनसाठी विचार व्हावा
गिरणा धरणात ४६ टक्के पाणीसाठा आहे. कॅनॉलमधून पाणी सोडता येणार नाही. असे पाणी सोडणे धोकादायक आहे. नदीपात्रातून पाणीसोडावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. वाळूचे खड्डे भरत वेळ जातो. त्यामुळे पाईपलाईनने पाणीपुरवठा करावा.
अन्य जिल्ह्यांच्या मदतीसाठीही सज्जता
जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना ओझरखेडा येथे मानवनिर्मित तलावात हतनूरमधून पाणीसाठा करण्यात आला असून जर लगतच्या जिल्ह्यांना गरज भासली तर सांगलीहून ज्याप्रमाणे लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा झाला, त्यानुसार या ठिकाणाहून पाणी नेता येईल, असे सांगितले.