तीन वर्षांपासून विस्तार अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:14+5:302021-05-30T04:14:14+5:30
जळगाव : एमपीएससीच्या वतीने उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब पदांसाठी १३ ऑगस्ट २०१७ रोजी मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली ...
जळगाव : एमपीएससीच्या वतीने उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब पदांसाठी १३ ऑगस्ट २०१७ रोजी मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील अनेक शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना निकालाची प्रतीक्षा लागून आहे.
सद्य:स्थितीला महाराष्ट्रात उपशिक्षणाधिकारी व ‘गट-ब’ची ४५६ रिक्त पदे आहेत. त्यात अधीक्षक १६, अधिव्याख्याता ७८, तसेच शालेय पोषण आहार अधीक्षकांच्या २७५ पदांचा समावेश आहे. या रिक्त पदांमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, एमपीएससीमार्फत सन २०१७ मध्ये उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब पदांसाठी मर्यादित विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, तीन वर्षांपासून या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना लागून आहे. या परीक्षेचा निकाल तात्काळ जाहीर करून रिक्त जागा त्वरित भरण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीने पुणे शिक्षण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे, तसेच निकाल लावण्यापूर्वी जिल्हा तांत्रिक सेवेचा विशिष्ट अनुभव नसलेली, निकटतम निम्न संवर्गात कार्यरत नसलेले कर्मचारी जाहिरातीमधील अटींची पूर्तता करीत नसल्याने निकाल लावण्यापूर्वी अपात्र ठरवून नंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.