पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जासाठी ३१ पर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:21 AM2021-08-25T04:21:07+5:302021-08-25T04:21:07+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी आणि एम.एस्सी./ एम.ए. (भूगोल) प्रथम वर्ष ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी आणि एम.एस्सी./ एम.ए. (भूगोल) प्रथम वर्ष या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांसाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
३१ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्याचे माहितीपत्रक, ऑनलाईन माहिती व नोंदणी अर्ज विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ याकरीता एम.एस्सी. (सर्व विषय) आणि एम.एस्सी./ एम.ए. (भूगोल) प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत देण्यात आली होती. मात्र, अंतिम वर्ष विज्ञान व अंतिम वर्ष कला (भूगोल) या अभ्यासक्रमाच्या काही पॅटर्नचे परीक्षा निकाल उशिरा जाहीर झालेले आहेत. तसेच काही विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व प्राचार्य यांनी प्रवेशाची मुदतवाढ संदर्भात विनंती केली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
४ सप्टेंबरला प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार
विद्यार्थ्यांनी त्यांचे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. नोंदणी शुल्क ऑनलाईनद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत भरता येतील. प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्रांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जांचे ई-व्हेरीफिकेशन २ सप्टेंबरपर्यंत करावे. ४ सप्टेंबरला प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यावर काही आक्षेप असल्यास ६ व ७ सप्टेंबरपर्यंत एआरसी केंद्रावर ई-मेलद्वारे नोंदविता येतील. ८ सप्टेंबरला संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. प्रवेशासाठी पहिली, दुसरी व तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.