अखर्चित निधी खर्च करण्यास मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:19 AM2021-09-26T04:19:36+5:302021-09-26T04:19:36+5:30

जळगाव : वेगवेगळ्या कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे शिल्लक असलेल्या निधीच्या खर्चास मुदतवाढ देण्यात आली असून यामुळे आता राहिलेली कामेदेखील ...

Extension till March 2022 to spend unspent funds | अखर्चित निधी खर्च करण्यास मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ

अखर्चित निधी खर्च करण्यास मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ

Next

जळगाव : वेगवेगळ्या कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे शिल्लक असलेल्या निधीच्या खर्चास मुदतवाढ देण्यात आली असून यामुळे आता राहिलेली कामेदेखील होण्यास मदत होणार आहे. या आदेशामुळे २०१९-२०मधील अखर्चित निधी आता मार्च २०२२पर्यंत खर्च करता येणार आहे. यात जि.प.कडे २५ कोटींचा निधी शिल्लक होता.

अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार एखाद्या आर्थिक वर्षात वितरीत केलेला निधी त्या-त्या आर्थिक वर्षात खर्च होणे अपेक्षित असून उर्वरित अखर्चित निधी शासनास समर्पित करणे आवश्यक आहे. तथापी जिल्हा परिषद, नगरपरिषद महापालिका, प्राधीकरणे यांना एखाद्या आर्थिक वर्षात दिलेला निधी पूर्णपणे खर्च करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शासनाने या स्थानिक स्वराज्य संस्थांना हा निधी लगतच्या पुढील आर्थिक वर्षअखेरपर्यंत खर्च करण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र पुढील एका आर्थिक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी अखर्चित राहिलेला निधी शासनाकडे परत करणे बंधनकारक राहणार असल्याचेही निर्देश आहेत.

मात्र, आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्यात आलेला निधी पुरेशा प्रमाणात खर्च होऊ शकला नाही. तसेच २०२०-२१मध्येही आठ महिने कोरोनात गेले. त्यामुळे निधी खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे या निधीच्या खर्चास ३१ मार्च २०२२पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसे आदेश वित्त विभागाचे उपसचिव जयंत कुलकर्णी यांनी २४ सप्टेंबर रोजी दिले.

या आदेशानुसार आता जिल्हा परिषदेकडे शिल्लक असलेला निधी मार्च २०२२पर्यंत खर्च करता येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये जिल्हा परिषदेकडे शिल्लक राहणाऱ्या निधीवरून नेहमी वादंग होत असते. आता नुकत्याच झालेल्या बैठकीतही याचा प्रत्यय आला होता. जिल्हा परिषदेचा २०१९-२० या वर्षातील जवळपास २५ कोटींचा निधी शिल्लक होता. जिल्हा परिषदेकडे जेवढा निधी शिल्लक असेल तेवढा निधी आता या आदेशामुळे मार्च २०२२पर्यंत खर्च करता येणार आहे.

Web Title: Extension till March 2022 to spend unspent funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.