बाह्यशक्तीचा हस्तक्षेप; एलसीबीत धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:07+5:302020-12-11T04:43:07+5:30
सुनील पाटील बाह्यशक्तीचा हस्तक्षेप; एलसीबीसाठी धोक्याची घंटा ! स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीत गेल्या काही दिवसांपासून बाह्यशक्तीचा हस्तक्षेप वाढला ...
सुनील पाटील
बाह्यशक्तीचा हस्तक्षेप; एलसीबीसाठी धोक्याची घंटा !
स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीत गेल्या काही दिवसांपासून बाह्यशक्तीचा हस्तक्षेप वाढला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मन व मतभेद निर्माण होऊ लागले असून, हे असेच सुरू राहिले तर ही धोक्याची घंटा असेल यात शंकाच नाही. एखाद्या कर्मचाऱ्याला एलसीबीत एन्ट्री मिळवायची असेल तर त्यासाठी मंत्री, आमदार, खासदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिफारशी होतात. एखाद्या पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदासाठी जितकी शक्ती खर्च करावी लागते, तितकीच शक्ती येथे एका कर्मचाऱ्याला खर्च करावी लागते. खरे तर एलसीबीचा मूळ उद्देश गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविणे आहे. मात्र येथे नेमका याचाच विसर सर्वांना पडला आहे. मूळ काम सोडून इतर उपद्व्याप करण्यातच कर्मचाऱ्यांना अधिक रस असल्याचे दिसून येत आहे. याला अधिकाऱ्याची संमती नाही, असे म्हणता येणार नाही. अनेक कर्मचारी आपल्यातील दुश्मनी, हेवेदावे व दुखणे काढण्यासाठी अधिकाऱ्यांचे कान भरण्याचे उद्योग करतात, त्यांचे ऐकून अधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाच तर त्याचा त्रास कर्मचाऱ्याऐवजी अधिकाऱ्याला होतो. कर्मचाऱ्याला आपला हेतू साध्य करायचा असतो, तो स्वत:च्या बंदुकीने नव्हे तर दुसऱ्या खांद्यावर बंदूक ठेवून करायचा असतो. अशातलाच काहीसा प्रकार तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या कार्यकाळात झाला होता. तेव्हा कार्यालयातच वाद उफाळून देणादण झाली होती, या प्रकाराने पोलीस दलाची बदनामी झाली होती, तेव्हाचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. आताही नेमकी तशीच परिस्थिती एलसीबीत निर्माण झाली असून, बाहेर प्रचंड खदखद होत आहे, ही खदखद केव्हा उफाळून येईल, हे सांगता येत नाही. येथून बदलून गेलेले अधिकारी व दुसऱ्या शाखेत काम करीत असलेले कर्मचारी यांचा एलसीबीत मोठा हस्तक्षेप वाढल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी भुसावळात स्वतंत्र बैठकाही होऊ लागल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यामुळेच आज एलसीबीत खदखद सुरू झाली आहे. नव्याने रुजू झालेले निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पूर्वी याच शाखेत उपनिरीक्षक म्हणून काम केलेले आहे, आता तेच या शाखेचे प्रभारी झाले. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती व आताची वेगळी आहे, असा हस्तक्षेप सुरू राहिला व त्यानुसार अंमलबजावणी होऊ लागली तर कर्मचाऱ्यांसोबतच प्रभारी अधिकाऱ्यासाठीदेखील ही धोक्याची घंटा समजली जात आहे.